- प्रतिबंधात्मक आदेश झुगारणाऱ्या कोयताधाऱ्यांचा हद्दीत सुळसुळाट?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०७ ऑक्टोबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शस्त्रबंदीचा प्रतिबंधात्मक आदेश लागू असतानाही वाकड परिसरात अवघ्या सव्वा तासाच्या अंतराने दोन तरुण लोखंडी कोयते घेऊन फिरताना आढळून आले. त्यामुळे पोलिसांच्या प्रतिबंधात्मक कारवाईवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आदेश असतानाही खुलेआम कोयते घेऊन फिरणाऱ्यांवर पोलिसांचा वचक किती आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये ३० सप्टेंबर ते १३ ऑक्टोबर या कालावधीत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शस्त्रे, कोयते, चाकू, तलवारी, काठ्या तसेच शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येणाऱ्या वस्तू बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी सुरू असतानाच वाकडमध्ये दोन स्वतंत्र घटनांमध्ये तरुण कोयत्यांसह आढळून आले.
पहिली घटना ६ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास कावेरीनगर भाजी मंडईच्या दक्षिण बाजूच्या मोकळ्या मैदानात घडली. शिवाजी राम मर्डेकर (वय १९, रा. चिंचवडगाव) हा हातात लोखंडी कोयता बाळगताना आढळून आला. याप्रकरणी वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. यानंतर अवघ्या सव्वा तासाने म्हणजे सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास औंध-रावेत बीआरटी रोडलगत, ताथवडे येथे समर्थ तम्मा बंदपट्टे (वय १८ वर्षे) हा हातात लोखंडी कोयता घेऊन फिरताना आढळून आला. त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
एकीकडे शहरात शस्त्रबंदीचा आदेश काढण्यात येतो, तर दुसरीकडे त्याच आदेशाच्या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी तरुणांकडून कोयते बाळगले जात असल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे, एकाच पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या सव्वा तासाच्या अंतराने अशा दोन घटना घडल्याने प्रतिबंधात्मक गस्त, तपासणी आणि पोलिसांच्या वचकाबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. प्रतिबंधात्मक आदेश केवळ कागदावरच आहेत का? आदेशाची काटेकोर अंमलबजावणी आणि पोलिसांची प्रभावी गस्त नेमकी कुठे आहे? असा सवाल या घटनांमुळे उपस्थित होत आहे.


















