- तब्बल ६१.३८ हेक्टर जागेवरील १० आरक्षणे बदलण्याचा घाट..
- महापालिकेच्या सभेपुढे प्रस्ताव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०७ ऑक्टोबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहराला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देण्यासाठी मोशी परिसरात तब्बल ६१.३८ हेक्टर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा गोल्फ कोर्स क्लब उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेने पुढे आणला आहे. मोशीतील विविध प्रयोजनांसाठी असलेली एकूण दहा आरक्षणे रद्द करून त्या जागेवर गोल्फ कोर्स क्लबसाठी नवीन आरक्षण टाकण्याचा प्रस्ताव १५ ऑक्टोबरला होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास पुढील कायदेशीर प्रक्रियेनंतर शहरात येरवडा येथील गोल्फ कोर्सच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहराच्या विस्तारासोबतच आयटी, औद्योगिक आणि सेवा क्षेत्रातील गुंतवणूक वाढत आहे. तळवडे परिसरातील आयटी पार्कसह भविष्यात हिंजवडी, माण, गहुंजे, मारुंजी, जांभे, नेरे आणि सांगवडे या नवीन गावांचा समावेश झाल्यानंतर शहराचा विस्तार आणखी वाढणार आहे. शहरात देश-विदेशातील उद्योगपती, आयटी अभियंते, अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील नागरिक वास्तव्यास येत असल्याने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करणे आवश्यक असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. मेट्रोच्या विस्तारामुळे भविष्यात शहरातील विविध भागांमधील संपर्क वाढणार असल्याने अशा सुविधांना अधिक महत्त्व प्राप्त होणार असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
मोशी परिसरातील महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यात विविध प्रयोजनांसाठी आरक्षित असलेल्या काही जागा सध्या पडिक आहेत. संबंधित जागांवर अद्याप कोणताही वापर सुरू झालेला नसल्याने या जागांचा एकत्रित विचार करून गोल्फ कोर्स क्लबसाठी त्यांचा वापर करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. मोशी परिसरात आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर, आयआयएम, न्यायालय, सीओईपी आणि पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय यांसारखे महत्त्वाचे प्रकल्प प्रस्तावित किंवा प्रगतिपथावर असल्याने भविष्यात हा परिसर शहरातील महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गोल्फ कोर्स क्लबसाठी मोशीतील जागा योग्य असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
यासाठी मोशीतील गट क्रमांक ३२७, ४३५, ४३६, ४३७, ४३८, ४३९, ४४०, ४४१, ४४२ आणि ४४३ या जागांवरील विविध प्रकारची दहा आरक्षणे बदलण्याचा प्रस्ताव आहे. एकूण ६१.३८ हेक्टर क्षेत्रावर गोल्फ कोर्स क्लबचे नवीन आरक्षण प्रस्तावित करण्यात आले आहे. मात्र, हा बदल थेट लागू होणार नसून महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ मधील कलम ३७ नुसार आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळाल्यानंतर प्रस्तावित आरक्षण बदलाबाबत नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यात येणार आहेत. त्यानंतर सुनावणी घेऊन अंतिम प्रस्ताव राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. त्यामुळे सध्या हा प्रस्ताव प्राथमिक टप्प्यात असून, शासनाच्या अंतिम मंजुरीनंतरच आरक्षण बदलाची पुढील प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
दरम्यान, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शहराच्या पुढील ५० वर्षांच्या विकासाचा आराखडा मांडताना जागतिक दर्जाचा गोल्फ क्लब आणि पीसीएमसी क्लब विकसित करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्यामुळे मोशीतील प्रस्तावित गोल्फ क्लबकडे शहराच्या भविष्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांच्या दृष्टीने पाहिले जात आहे. मात्र, ६१.३८ हेक्टर एवढ्या मोठ्या क्षेत्रावरील आरक्षण बदलामुळे या जागेचा सार्वजनिक हितासाठी नेमका कसा वापर होणार, त्यासाठी किती खर्च अपेक्षित आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना या सुविधेचा कितपत लाभ मिळणार, याबाबतही आगामी प्रक्रियेत स्पष्टता येणे अपेक्षित आहे.

















