न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वाकड दि. (७ ऑक्टोबर २०२६) :- टेम्पोच्या टपावर बसून प्रवास करणाऱ्या २० वर्षीय तरुणाचा टेम्पो अंडरपासमधील कॉलमला धडकल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. टेम्पो चालकाने वाहन भरधाव आणि निष्काळजीपणे चालविल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना ६ ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वादोनच्या सुमारास सोलिटायर सोसायटी, पिंक सिटी रोड, वाकड येथे घडली.
ऋषी धनंजय कुदळे (वय २०, रा.थेरगाव) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे वडील धनंजय श्रीनिवास कुदळे (वय ५०, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चालक तुषार ज्योतीराम माने (वय २२, रा. वाकड) हा टाटा टेम्पो चालवत होता. ऋषी कुदळे टेम्पोच्या टपावर बसलेला असल्याची चालकाला माहिती होती. असे असतानाही त्याने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून टेम्पो भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे अंडरपासमधून नेला.
अंडरपासमधून जात असताना टेम्पो अंडरपासमधील कॉलमला जोरदार धडकला. या धडकेत टपावर बसलेल्या ऋषी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर वाकड पोलिसांनी चालक तुषार माने याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घुगे आणि शिरसाठ करीत आहेत.


















