न्यूज पीसीएमसी नेटवर्क
दक्षिण महाळुंगे (दि. ७ ऑक्टोबर २०२६) :- मादकद्रव्याचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या व्यक्तीने पोलिस ठाण्यात आणल्यानंतर पोलिसांच्या कर्तव्यात अडथळा निर्माण करत ठाणे अंमलदार कक्षासमोरील काचेवर डोके आपटून काच फोडल्याची घटना दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात घडली.
भारत धावरू राठोड (वय ३२, रा. ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार संतोष रामजाधव यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबर रोजी रात्री नऊच्या सुमारास आरोपी मादकद्रव्याचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ करताना आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात आणले. मात्र, पोलिस ठाण्यात आल्यानंतरही त्याने गोंधळ घालत कर्तव्यावर असलेल्या पोलिस अधिकारी व अंमलदारांच्या कामात अडथळा निर्माण केला.
दरम्यान, आरोपीने ठाणे अंमलदार कक्षासमोरील काचेवर डोके आपटले. त्यामुळे काच फुटून नुकसान झाले. या प्रकरणी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.४७ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह सार्वजनिक संपत्तीचे नुकसान प्रतिबंधक कायदा, महाराष्ट्र दारूबंदी कायदा आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

















