न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. ८ ऑक्टोबर २०२६) :- रहाटणी येथील पाच आर जमीन खरेदी करून तेथे भागीदारीत बांधकाम व्यवसाय सुरू करण्याचे आमिष दाखवून महिला कन्सल्टंटची तब्बल ८० लाख ५३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी काळेवाडी पोलिसांनी समाधान पोपट गेजगे (वय ४०, रा. पिंपळे गुरव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने रहाटणी येथील निवासी झोनमधील पाच आर जमीन खरेदी करण्यासाठी १ कोटी ८४ लाख रुपये लागतील, असे सांगितले. त्यातील अर्धी रक्कम आपण भरणार असल्याचे सांगून फिर्यादी व त्यांच्या पतीचा विश्वास संपादन केला. तसेच दोघांच्या भागीदारीत ‘पी.व्ही. डेव्हलपर्स’ नावाची संस्था स्थापन करून त्या जागेवर बांधकाम करण्याचे आश्वासन दिले.
या आश्वासनावर विश्वास ठेवून फिर्यादी व त्यांच्या पतीने आरोपीला ८० लाख ५३ हजार रुपये आरटीजीएस, नेट बँकिंग व आयएमपीएसच्या माध्यमातून दिले. मात्र, त्यानंतर जमीन खरेदीबाबत फिर्यादीने वारंवार विचारणा करूनही आरोपीने कोणतीही कागदपत्रे दाखवली नाहीत.
फिर्यादीने दिलेली रक्कम परत मागितल्यानंतर आरोपीने खात्यात पुरेशी रक्कम नसतानाही चेक दिले. तसेच आयएमपीएसचे खोटे संदेश पाठवून दिशाभूल केल्याचा आरोप आहे. याशिवाय फ्लॅट घेऊन देण्याचे आश्वासन देत वेळकाढूपणा केला. वेगवेगळी कारणे सांगून रक्कम परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी काळेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणाचा पुढील तपस पोलीस उपनिरीक्षक नाईक निंबाळकर करीत आहेत.


















