न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. ८ ऑक्टोबर २०२६) :- चाफेकर उड्डाणपुलावर रिक्षाने दुचाकीला धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना २६ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी रिक्षाचालकाला ताब्यात घेतले आहे.
मोहन नथुसिंग राजपूत हे मोटारसायकलवरून नेहरुनगरहून थेरगावच्या दिशेने जात होते. चाफेकर उड्डाणपुलावरून जात असताना आरोपी रिक्षाचालक वकास अर्जुन बनसोडे (वय ३६) याने ओव्हरटेक करताना त्यांच्या दुचाकीला रिक्षाची धडक दिली. त्यामुळे राजपूत रस्त्यावर पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर रिक्षाचालकाने जखमी राजपूत यांना आदित्य बिर्ला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना चिखली येथील गुंजकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना २ ऑक्टोबर रोजी त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी ७ ऑक्टोबर रोजी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. निष्काळजीपणे वाहन चालवून राजपूत यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपाससाहाय्यक पोलीस निरीक्षक ढवन करत आहे.


















