- “एमपीएससी” आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांशी संवाद..
- परीक्षा प्रक्रियेबाबत सरकार सकारात्मक असल्याचा दावा…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पुणे, दि.11 ऑक्टोबर 2026 :- “एमपीएससी” स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करणार असून, त्यांच्या प्रश्नांवर लवकरात लवकर निर्णय व्हावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आमदार शंकर जगताप यांनी दिले.
पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यानी पुकारलेल्या सदाशिव पेठे येथील आंदोलनस्थळी आमदार जगताप यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या आणि अडचणी जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार जगताप म्हणाले, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. या तयारीसाठी ते अनेक वर्षे मेहनत घेतात आणि आर्थिक व मानसिक आव्हानांचा सामना करतात. त्यामुळे त्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहणे आवश्यक आहे.
एमपीएससीचा विद्यार्थी असल्याने अडचणींची जाण..
मी स्वतः १९९७ ते २००० या काळात एमपीएससीचा विद्यार्थी होतो. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, याची मला जाणीव आहे. विद्यार्थी आणि लोकप्रतिनिधी या दोन्ही भूमिकांतून त्यांच्या प्रश्नांकडे पाहताना योग्य तोडगा निघणे महत्त्वाचे वाटते. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर लवकर निर्णय व्हावा आणि त्यांच्या मनातील शंका दूर व्हाव्यात, यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
परीक्षा प्रक्रियेतील विश्वासार्हता महत्त्वाची…
एमपीएससीच्या परीक्षांमधील कथित गैरप्रकार आणि अनियमिततेच्या आरोपांमुळे परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन होणे, संबंधित तक्रारींची योग्य चौकशी होणे आणि भरती प्रक्रिया अधिक विश्वासार्ह बनणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या काही मागण्यांवर सरकारने यापूर्वी सकारात्मक भूमिका घेतली असून, उर्वरित मागण्यांवरही विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः वस्तुनिष्ठ (ऑब्जेक्टिव्ह/MCQ) परीक्षा पद्धतीबाबत विद्यार्थ्यांच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी सरकार निश्चितपणे विचार करेल, अशी अपेक्षा जगताप यांनी व्यक्त केली.
आंदोलन संविधानिक मार्गाने अपेक्षित…
विद्यार्थ्यांना आपल्या मागण्या मांडण्याचा अधिकार असून, त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करून न्याय्य मार्ग काढणे आवश्यक आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा राजकीय स्वार्थासाठी वापर होऊ नये. कायदेशीर मर्यादा आणि उपलब्ध पर्याय लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या हिताचा मार्ग शोधण्याची गरज आहे. एमपीएससी परीक्षांबाबत पारदर्शकता, वेळेत भरती आणि तक्रारींची निष्पक्ष चौकशी या मुद्द्यांवर विद्यार्थ्यांमध्ये चिंता व्यक्त होत असताना, त्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय होणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि व्यावसायिक भवितव्य लक्षात घेऊन या प्रश्नावर लवकरात लवकर मार्ग निघावा, अशी भूमिका जगताप यांनी मांडली.

















