- महापालिका वर्धापन दिनानिमित्त शिल्पकाराला अभिवादन…!
- उद्योगनगरी अधिक सुंदर आणि प्रगत करण्याचा केला निर्धार…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. 11 ऑक्टोबर 2026) :- अण्णासाहेब मगर यांनी पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा पाया रचला, तर लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांनी विकासाचा कळस चढवत उद्योगनगरीला सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रांतही वेगळी ओळख मिळवून दिली. या दोन्ही द्रष्ट्या नेत्यांच्या योगदानातूनच शहराच्या विकासाचा इतिहास घडला, असे प्रतिपादन महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी (दि. ११ ऑक्टोबर) महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात शहराचे शिल्पकार आणि माजी नगराध्यक्ष दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात सभापती बारणे यांनी शहराच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या नेतृत्वाच्या कार्याचे स्मरण केले.
सभापती बारणे म्हणाले, शहराच्या विकासाचा पाया रचणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच शहराच्या प्रगतीला चालना देणे आवश्यक आहे. शहराच्या विकासाची परंपरा पुढे नेत पिंपरी-चिंचवडला अधिक सुंदर आणि प्रगत बनवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे अपली जबाबदारी आहे, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.
या अभिवादन कार्यक्रमास सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसदस्य विनोद नढे, उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत आणि विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांचे विचार व कार्य पुढे नेणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. शहराला अधिक प्रगत, सुंदर आणि विकसित बनवण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध आहोत. – अभिषेक बारणे, सभापती, स्थायी समिती सभा…

















