- डॉ. बाबा कांबळे यांचा इशारा..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे, दिनांक १२ ऑक्टोबर २०२६ : रॅपिडो (Rapido) कंपनीच्या बाईक टॅक्सी सेवेमुळे कायदेशीर नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत, या कंपनीवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया यांनी केली आहे. यासंदर्भात पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) निवेदन देण्यात आले आहे. येत्या आठ दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी दिला.
खासगी नंबर प्लेटच्या दुचाकींच्या वापरावर आक्षेप…
रॅपिडो कंपनीकडून खासगी (प्रायव्हेट) नंबर प्लेट असलेल्या दुचाकींचा वापर प्रवासी वाहतुकीसाठी केला जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. आवश्यक शासकीय परवाने आणि नियमांचे पालन न करता बाईक टॅक्सी सेवा चालवली जात असल्याने शासनाचा महसूल बुडत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
२०१९ मध्ये पुण्यात रिक्षाचालकांनी केलेल्या आंदोलनानंतर रॅपिडो कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचा संदर्भ संघटनेने दिला आहे. त्यानंतर या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत कायदेशीर लढा झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. न्यायालयीन आदेश आणि लागू वाहतूक नियमांचे उल्लंघन करून सेवा सुरू असल्याचा आरोप करत, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.
या तीन प्रमुख मागण्यांसाठी आरटीओला निवेदन…
महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने प्रशासनाकडे तीन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
1\. बाईक टॅक्सी सेवा बंद करून गुन्हा दाखल करा : नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेली बाईक टॅक्सी सेवा तात्काळ बंद करावी आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करावा.
2\. ॲपवरील दरांची कायदेशीर अंमलबजावणी करा : शासनाने निर्धारित केलेल्या हकीम समितीच्या सूत्रानुसार ऑटो आणि टॅक्सीचे दर मोबाईल ॲपवर प्रदर्शित करण्याची व्यवस्था करावी.
3\. चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करा : रिक्षा व टॅक्सीचालकांच्या सामाजिक सुरक्षेसाठी आणि न्याय्य हक्कांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळाची स्थापना करावी.
आठ दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलन…
आरटीओ अधिकाऱ्यांसोबत झालेली चर्चा कॅमेऱ्यासमोर पार पडल्याचे संघटनेने सांगितले. रिक्षा व टॅक्सीचालकांच्या प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका डॉ. बाबा कांबळे यांनी मांडली. आठ दिवसांत रॅपिडो कंपनीविरोधात कायदेशीर कारवाई झाली नाही, तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
या निवेदनावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत, ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया आणि ऑटो टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या (महाराष्ट्र राज्य) पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता.
राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंद तांबे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात पुणे जिल्हाध्यक्ष संतोष (नाना) गुंड, पुणे शहराध्यक्ष विलास केमसे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष विजय ढगारे, कार्याध्यक्ष दीपक ताठे, पिंपरी-चिंचवड शहर युवक अध्यक्ष विशाल ससाने, ग्रामीण पुणे जिल्हाध्यक्ष तात्या ठाकूर, उपाध्यक्ष संजय शिंदे, प्रविण शिखरे पाटील, विल्सन मस्के, भाऊसाहेब शेलार, सुरज सोनवणे, शहीद शेख, रविराज कदम, विशाल शिंदे, राकेश मिसाळ आणि समीर शेख यांच्यासह अन्य पदाधिकारी व रिक्षाचालक उपस्थित होते.


















