न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जून २०१९) :- बोपखेल व खडकीला जोडणाऱ्या मुळा नदीवरील पुलाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्या कामास मंजुरी देण्याचा प्रस्ताव अखेर स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी हे काम सुरू करण्याचे पालिका प्रशासनाचे नियोजन आहे. या कामासाठी पालिकेने २९ मार्च २०१९ पर्यंत निविदा मागविल्या होत्या. निविदा २० एप्रिलला उघडण्यात आल्या. त्यात टी अॅण्ड टी. इन्फ्रा. लिमिटेड या कंपनीची एकमेव निविदा प्राप्त झाली. कंपनीची ५६ कोटी ६७ लाख ३० हजारांची मूळ निविदा आहे.
दर कमी करण्याबाबत पालिकेने कंपनीकडे विचारणा केली. कंपनीने दर १८ जूनच्या पत्रानुसार ५२ कोटी ८३ लाख ४२ हजार इतका सुधारित दिला. सन २०१८- १९ च्या एसएसआर दरसूचीनुसार कामाची किमत ५३ कोटी ९९ लाख २७ हजार ९३१ रुपये येते. त्यात जीएसटीचा समावेश नाही. कंपनीने दिलेला दर ५३ कोटी ५३ लाख ५९४ असून, तो निविदा प्रक्रिया स्वीकृत योग्य दरानुसार ०.८५ टक्के कमी आहे. त्यामुळे सदर निविदेस प्रशासनाने मंजुरी दिली असून, अंतिम मान्यतेसाठी येत्या बुधवारी (दि .२६) रोजी होणाऱ्या स्थायी समितीसमोर प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने १५ दिवसांच्या कालावधीत पुलाच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करावेत, असे आदेश २८ जानेवारीला दिले होते. त्या आदेशानुसार पालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही करीत निविदा प्रक्रिया राबविली आहे. त्यासाठी स्थापत्य मुख्यालयाने नविदा प्रक्रिया प्रसिद्ध केली. त्यात केवळ एकाच कंपनीची निविदा प्राप्त झाल्याने फेरनिविदा काढली. त्यातही एकच कंपनी आल्याने आयुक्तांनी सदर निविदेस मंजुरी दिली आहे.
अशी आहे पूलाची रचना :-
बोपखेल ते खडकीला जोडणाऱ्या या पुलाची लांबी १ हजार ८८० मीटर (१.९ किमी) आहे. हा पूल खडकीच्या आर्मी बेस वर्कशॉपच्या प्रवेशद्वारासमोरून जाऊन अॅम्युनिशन फैक्टरीसमोरील रणगाडा मार्गावर उतरिवला जाणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पुलाच्या दोन्ही बाजूस उंच सीमा भित असणार आहे. रस्त्यांची रूंदी ८. ४ मीटर आहे. पदपथ नसणार आहे. कामाची मुदत २ वर्षे आहे.













