न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जून २०१९) :- संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी मंगळवारी (दि. २५) रोजी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. पालखी बुधवारी (दि. २६) रोजी पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतून मार्गस्थ होणार आहे. या सोहळ्यात ई क्षेत्रीय कार्यालयाचे कर्मचारी व अधिकारी स्वछतेबाबत जनजागृती दिंडी काढणार आहेत.
महापालिका हद्दीतील चऱ्होली फाटा ते दिघी जकात नाका दरम्यान स्वच्छता जनजागृती दिंडी काढण्यात येणार आहे. दिंडीत सहभागी होणारे कर्मचारी व अधिकारी स्वच्छतेच्या दृष्टीने माहिती देणारे फलक हातात घेणार आहेत. तसेच स्वच्छतेबाबत घोषणा देण्यात येणार आहेत. ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने वारक-यांसाठी ५० पोर्टेबल शौचालये, ४ शौचालय व्हॅनची सुविधा करण्यात येणार आहे. तसेच १० घंटागाड्यांची सोय करण्यात येणार आहे.
पालखी सोहळ्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून परिसराची स्वछता करण्यात येत आहे. त्यासाठी शंभर कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. बुधवारी पालखीसोबत ५० आरोग्याचे कर्मचा-यांचे पथक तैनात राहणार असल्याची माहिती, क्षेत्रीय अधिकारी श्रीनिवास दांगट यांनी दिली.













