न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जून २०१९) :- तलाठ्याने जप्त केलेला वाळूचा ट्रक आकुर्डी प्राधिकरणातील तहसीलदार कार्यालयाच्या पार्किंगचे कुलूप तोडून चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. २१) रोजी रात्री आठ ते शनिवार (दि. २२) रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली.
याप्रकरणी सांगवीच्या महिला तलाठी रुपाली प्रवीणसिंग परिहार (वय ४०, रा. किन्स गार्डन, जनरल वैद्य मार्ग, पुणे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ट्रक चालक अरविंद गोपीनाथ खिल्लारे (रा. पुसद काखेडा, बुद्रुक, यवतमाळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनधिकृतपणे वाळू उपसा करुन ती विकण्यासाठी आणलेला ट्रक (एमएच १६, सी. जी. ५७४९) हा काही दिवसांपूर्वी तलाठ्यांच्या पथकाने पकडून जप्त केला होता. हा ट्रक आकुर्डी-प्राधिकरणातील तहसीलदार कार्यालयाच्या कुलूपबंद पार्किंगमध्ये ठेवला होता. शुक्रवारी रात्री आठ ते शनिवार (दि. २२) पहाटे साडेतीन या दरम्यान या ट्रकवरील चालक आरोपी अरविंद याने प्राधिकरण येथील तहसील कार्यालयाच्या पार्किंगच्या गेटला लावलेली साखळी तोडून आतमध्ये प्रवेश केला. ट्रकला लावलेली लोखंडी साखळीही तोडून चालक अरविंद त्याच्याकडील डुप्लीकेट चावीने ट्रक चालू केला. वाळूसोबत ट्रक घेवून पसार झाला. निगडी पोलीस चालक व ट्रकचा शोध घेत आहेत.













