न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पदाधिका-यांनी एका महिन्याच्या मानधनातून आषाढीवारीतील दिंड्यांना मृदुंग भेटवस्तू देण्याबरोबरच दुष्काळग्रस्तांसाठी निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता सर्व महापालिका आस्थापनेवरील सर्व राजपत्रित तसेच अधिकारी देखील जून महिन्यातील एका दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहेत.
राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने तसा अध्यादेश काढला आहे. सर्व महापालिकांच्या आयुक्तांना त्याचे पालन करण्याचा आदेश दिला आहे. राज्यात दुष्काळाची स्थिती भयानक आहे. मॉन्सूनचे आगमन लांबल्याने त्यात आणखी भर पडली आहे. दरम्यान, आषाढीवारीत आणि सहभागी होणाच्या दिंड्यांना कोणतीही भेटवस्तू न देण्याची सूचना दोन्ही दिंडी सोहळ्यातील मानक-यांनी केली होती.
त्यावर महापालिका पदाधिका-यांची सहमती झाली होती. हा निधी दुष्काळग्रस्तांना देण्याचे जाहीर केले होते. मात्र, दिंड्यांना भेटवस्तू न देण्याची परंपरा खंडीत होत असल्याची जाणीव होताच, या निर्णयावर ‘यू टर्न’ घेत सर्व नगरसेवकांच्या एका महिन्याच्या मानधनाच्या रकमेतून दिंड्यांना मृदंग भेट देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.













