न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे:- पुण्यातील माहिती तंत्रज्ञान हब असलेल्या हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाय ठरणाऱ्या हिंजवडी ते शिवाजीनगर या पुणे मेट्रो ३ प्रकल्पाच्या कामाचे प्रकल्प प्रदान पत्र (लेटर ऑफ ॲवॉर्ड) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ट्रेल अर्बन ट्रान्स्पोर्ट प्रा. लि. (टीयूटीपीएल) सिमेन्स कंपनीला देण्यात आले.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने ते देण्यात आले. येत्या तीन वर्षांत या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे हिंजवडीत जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पुणे मेट्रो ३ च्या हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील हा संपूर्ण एलिव्हेटेड प्रकल्प असून, तो सार्वजनिक खासगी भागीदारीतून राबविण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनासह टाटा ग्रुपची कंपनी ‘टीयूटीपीएल’ आणि सिमेन्स हे भागीदार आहेत. या कंपन्यांना आज कार्यारंभ आदेश देण्यात आला.
मुख्यमंत्री म्हणाले, ”नव्या मेट्रो रेल्वे धोरणांतर्गत हा पहिलाच प्रकल्प आहे. पुण्यासाठी तो महत्त्वाचा असून, राज्य शासन संपूर्ण सहकार्य करणार आहे.” अगरवाल म्हणाले, ”दीर्घ काळातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण आहे. या प्रकल्पामुळे पुण्यात आर्थिक क्षेत्रात वाढीबरोबरच रोजगार संधीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन परिवर्तन होणार आहे.”
















