न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०१९) :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने कडुलिंबाच्या रोपे वाटपांचा विश्वविक्रम करण्यात आला. त्याची नोंद गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली. पुणे येथे रविवारी (दि. २३ जून) झालेल्या या कार्यक्रमात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयातील (पीसीसीओई) राष्ट्रीय सेवा योजनेच्या १०७ विद्यार्थ्यांनी प्रा. निखिल सुरवाडे, प्रा. नितीन कुरवार, प्रा. तन्मय खांबेकर यांच्या समवेत सहभाग घेतला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात एकूण १६ हजार ७३१ कडुलिंबाची रोपे विद्यार्थ्यांना वाटण्यात आली. ही रोपे चांगल्या ठिकाणी लावून त्याचे संगोपन करण्याचा निश्चय विद्यार्थ्यांनी केला.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्हि.एस. काळभोर खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. ए.एम. फुलंबरकर, डॉ. प्रा. शीतल भंडारी यांचे मार्गदर्शन लाभले.


















