न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे :- पुण्यातील जुना बाजार येथील अमर शेख चौकातील एक मोठे होर्डिंग कोसळून नऊ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना दुपारी दीडच्या सुमारास घडली. या घटनेत दोन जणांचा मृत्यू तर नऊ जण जखमी असून त्यातील तीन जण अत्यवस्थ असल्याचे समजत आहे. जखमींना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सदर घटना घडली अशी….
पुण्यातील अमर शेख चौकात अनधिकृत होर्डिंग काढण्याकरिता रेल्वे प्रशासनाकडून एका ठेकेदाराला होर्डिंग काढण्याचा ठेका देण्यात आला होता. होर्डिंग काढताना होर्डिंगचा मागील सपोर्ट काढल्यामुळे पूर्ण होर्डिंग कोसळून रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांवर कोसळले. यामध्ये पाच रिक्षांचा समावेश आहे.
सदर होर्डिंग काढण्याकरिता साल २०१३ पासून रेल्वेला महापालिकेने वारंवार पत्र दिले होते. मात्र कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही, असा आरोप महापालिकेने केला आहे.
महापालिकेने सदर ठिकाणी ४० x २० साईजच्या होर्डिंगला परवानगी दिली होती. मात्र नियम धाब्यावर बसवत दिलेल्या प्रमाणापेक्षा कितीतरी मोठे होर्डिंग याठिकाणी लावण्यात आले होते, असे, महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त विजय दहीभाते यांनी सांगितले.


















