न्यूज पीसीएमसी नेटवर्क
नवी दिल्ली – संजय लीला भन्साळीचा सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर अभिनेत्री दीपिका पादुकोण आता मेघना गुलजारच्या चित्रपटामध्ये झळकणार आहे. सोबतच ती या चित्रपटाची निर्मितीही करणार आहे. हा चित्रपट अॅसिड पीडित लक्ष्मी अग्रवाल यांच्या संघर्षावर आधारित असणार आहे.
याबद्दल बोलताना दीपिका म्हणाली की, या चित्रपटाची कथा ऐकल्यावर माझे मन पूर्णतः हादरून गेले. कारण ही फक्त एका हिंसेची कथा नसून साहस, ताकद, आशा आणि विजयाची कथा आहे. लक्ष्मीच्या कथेने मला मनापासून प्रभावित केले. म्हणून मी भूमिकेसाठी तयार झाले. दरम्यान, या चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरविण्यात आलेले नाही.
लक्ष्मी अग्रवाल यांच्यावर अॅसिड हल्ला झाल्यानंतरही त्यांनी हार न मानता स्वतःला सांभाळले. सोबतच आपल्यासारख्या अन्य महिलांना उभारी मिळावी यासाठी ‘स्टॉप अॅसिड अटॅक’ या नावाने अभियानही चालवत आहेत. मध्यंतरी त्या फॅशन शोमध्येही झळकल्या होत्या.


















