- स्थायी सदस्य कलाटे यांनी सभेत खुलासा देण्याची केली मागणी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रशासकीय आचारसंहिता मोडीत काढत, शहर भाजपच्या कार्यालयात जाऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी तासभर चर्चा केली. या प्रकरणाने आयुक्तांची चांगलीच गळचेपी झाली. त्यासाठी त्यांना स्थायीची बुधवार (दि. २६) तारखेला होणारी नियोजित सभाही तहकूब करावी लागली.
तहकूब सभा आज गुरुवार (दि. २७) रोजी महापालिकेने आयोजित केली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी स्थायी सभापती विलास मडिगेरी होते. सभा सुरु होताच राष्ट्रवादीचे स्थायी समिती सदस्य मयूर कलाटे यांनी आयुक्तांना त्या गोष्टीचा खुलासा देण्याची मागणी केली. परंतु, आयुक्तांनी गप्प राहत, खुलासा केला नाही.
मात्र, कलाटे यांनी या विषयावर अग्रेसर होत आयुक्तांना पून्हा बोलण्याची मागणी केली. शेवटी सभापती मडिगेरी यांनी मध्यस्थी करीत, तुम्ही काल या विषयावर आंदोलन केले आहे. तसेच आयुक्तांनी याबाबत प्रसारमाध्यमांना खुलासा केला आहे. त्यामुळे तुम्ही हा विषय सोडण्याची मागणी केली. शेवटी खुलासा न मिळाल्यामुळे कलाटे चांगलेच संतापले व त्यांना राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयालाही भेट द्या, असे निमंत्रणपत्र दिले.
आयुक्तांच्या त्या कृतीने आयुक्त हे सत्तारुढ भारतीय जनता पक्षाचे घरगडी, दलाल, प्रवक्ते म्हणून काम करणारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे भ्रष्ट आयुक्त आहेत. त्यांच्या या कृतीचा निषेध करीत आहे, असे कलाटे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.













