- कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्पर्धेत नोंदणी करण्याचे आवाहन
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जुलै २०१९) :- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई – नवमहाराष्ट्र युवा अभियान व रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरीता यशवंत शब्दगौरव महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील स्पर्धा विभागीय व अंतिम अशा दोन फेर्यांमध्ये घेण्यात येणार आहे. मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, चिपळून या नऊ शहरांमध्ये विभागीय फेरी पार पडणार आहे.
पुणे येथे मंगळवार, दि. २७ ऑगस्ट २०१९ रोजी, सकाळी १० वा. रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी कॉलेज, माळवाडी, हडपसर येथे विभागीय फेरी संपन्न होणार आहे. यामध्ये पुणे, सोलापूर व अहमदनगर या तीन जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना सहभाग नोंदविता येईल.
वक्ता दशसहस्त्रेषू असे म्हणतात. विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यात आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी, व्यक्तिमत्व विकासासाठी वक्तृत्व कला आवश्यक आहे. त्यासाठीच अधिकाधिक वक्ते निर्माण होऊन, विविध विषयांवर सखोल वाचन आणि विचार मंथन होऊन सद्विचारांचा ओघ अखंड रहावा, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
विभागीय फेरीसाठी स्पर्धेचे विषय पुढील प्रमाणे :-
१) भारतीय लोकशाही व निवडणूक व्यवस्था २) यशवंतराव चव्हाण यांची कारकीर्द : शोध आणि बोध ३) महाराष्ट्राच्या महिला धोरणाची २५ वर्षे ४) जातींचं काय करायचं? व्यवस्थापक कि निर्मूलन? ५) सोशल मिडिया : मी आहे नेहमी ऑनलाईन!.
प्राथमिक फेरीतील प्रथम विजेत्यास रुपये पाच हजार व स्मृतिचिन्ह, द्वितीय विजेत्यास रुपये तीन हजार व स्मृतिचिन्ह, तृतीय विजेत्यास रुपये दोन हजार व स्मृतिचिन्ह व उत्तेजनार्थ दोन विजेत्यांना रुपये एक हजार व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेची अंतिम फेरी दि. १८ सप्टेंबर २०१९ रोजी रंगस्वर सभागृह, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मंत्रालयासमोर, मुंबई येथे संपन्न होणार आहे. अंतिम फेरीकरीता अनुक्रमे रुपये पंधरा हजार व स्मृतिचिन्ह, रुपये दहा हजार व स्मृतिचिन्ह, रुपये सात हजार व स्मृतिचिन्ह, व रुपये तीन हजार व स्मृतिचिन्ह (दोन विजेते) अशी प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांकाची पारितोषीके असणार आहे.
स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य असून नाव नोंदणीची अंतिम तारीख गुरुवार, दि. २२ ऑगस्ट २०१९ आहे. इच्छुक स्पर्धकांनी स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीकरीता www.ycpmumbai.com या वेबसाईटवर अथवा [email protected] या मेल आयडीवर तसेच डॉ. अमित नागरे – ८६०५२१००५२, डॉ. प्रभंजन चव्हाण ९५२७१९२७१५, डॉ. पांडूरंग भोसले ९४२३२५५०३८ या क्रमांकांवर संपर्क साधावा व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन विभागीय केंद्राचे अध्यक्ष अजित निंबाळकर, सचिव अंकुश काकडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . अरविंद बुरुंगले, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई नवमहाराष्ट्र युवा अभियानचे राज्यसंघटक नीलेश राऊत, डॉ. अमित नागरे आदींनी केले आहे.


















