न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जुलै २०१९) :- ऑटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात मुंबई येथे मंगळवार (दि. ९) रोजी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी रिक्षा चालकांच्या प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. यावेळी रिक्षा चालकांच्या कल्याणकारी मंडळाचे आठ दिवसांत गठन करुन, कमिटी स्थापन करण्याचे आश्वासन देण्यात आले. सदर कमिटीमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबरच रिक्षा चालकांचे तीन प्रतीनिधी म्हणून कृती समीतीच्या पदाधिकाऱ्यांना शिफारसीचे अधिकार देण्यात आले. सदर कमिटी तीन महिण्यात कल्याणकारी मंडळाचा कृती आराखडा शासनाला सादर करेल. सदर कल्याणकारी मंडळास जास्तीत निधी उपलब्ध करून देण्यात येईल, यातून रिक्षा चालकांना म्हतारपणी पेन्शन, सामाजिक सुरक्षा, आरोग्यविमा, मुलांना शिक्षणासाठी मदत या बाबींचा समावेश असेल.
अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्याकरीता कायमस्वरूपी भरारी पथक नेमण्याचे आदेश परिवहन खात्याला त्वरित देण्यात आले असुन, प्रादेशिक परिवहन कार्यालयांमार्फत त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. महाराष्ट्रातील मुक्त रिक्षा परवाना धोरणामुळे रिक्षांची संख्या बेसुमार वाढल्याने अनेक समस्या निर्माण झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्वतः कबूल केले असुन, रिक्षा परवाना बंद करणे आवश्यक असल्याने सदरचा निर्णय त्वरित घेतला जाईल.
तसेच रिक्षा भाडेवाढी संदर्भात चर्चा करताना शासनाने हकीम समिती आणि खटुवा समितीची नियुक्ती केली होती. त्यांनी भाडेवाढी सबंधित अहवाल शासनाला दिलेला आहेत. महागाई निर्देशांकानुसार भाडेवाढ देणे आवश्यक असुन, सदरचा निर्णय येत्या काही दिवसात घेण्यात येईल.
ऑटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र वतीने ९ जुलै पासून बेमुदत रिक्षा संप आंदोलन करण्यात आले होते. मुख्यमंत्री यांनी चर्चेद्वारे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिल्यामुळे बेमुदत संप तूर्त स्थगित करण्यात आला होता. परंतु, मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्यामुळे
तूर्त स्थगित केलेला संप यावेळी मागे घेण्यात आला. त्याची घोषणा शशांक राव यांनी पत्रकार परिषदेत केली.
बाबा कांबळे म्हणाले की, महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच मुख्यमंत्र्यांनी स्वतः रिक्षा चालकांच्या प्रश्नांसंदर्भात एक तासापेक्षा अधिक वेळ देऊन, रिक्षा चालकांच्या समस्या जाणून घेतल्या. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या तात्काळ निर्णयाच्या समर्थनार्थ सर्व संघटना प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
या बैठकीस ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, कृती समीतीचे अध्यक्ष शशांक राव, सरचिटणीस बाबा कांबळे, कार्याध्यक्ष विलास भालेकर, उपाध्यक्ष प्रमोद घोणे, मारुती कोंडे, शंकर साळवी, राज्य कार्यकारणी सदस्य आनंद तांबे, एलियाज लोधी खान, पुणे कृती समितीचे प्रदीप भालेराव, बापू धुमाळ, दत्त पाटील, सुरेश जगताप, नवी मुंबई कृती समीतीचे सरचिटणीस सुनील बोर्डे, ज्ञानेश्वर कोळी, श्रीरंग जाधव, महाराष्ट्र रिक्षा पंचायत रायगड अध्यक्ष बाळा जगदाळे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष लखन लोंढे, बालाजी कांबळे यांच्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील रिक्षा संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.


















