न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जुलै २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अनास्थेमुळे शहरात चोहीकडे कच-याचे साम्राज्य पसरलेले आहे. महापालिकेने नियुक्त केलेल्या ठेकेदारांना त्यांच्या मनाप्रमाणे सवलती देऊनही शहरातील कचरा जागचा हालत नसेल, तर पिंपरी चिंचवड महापालिकेचा स्मार्ट सिटीत समावेश करून काय हाशील? असा संतप्त सवाल पिंपरी चिंचवड मनसेच्या महिलाध्यक्षा आश्विनी बांगर यांनी महापालिका आयुक्त व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केला आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात जेथे जाईल तेथे रस्त्याच्या कडेला कच-याचे ढिगच-ढिग व राडारोडा दिसत आहे. पावसाळा सुरु झाला असल्यामुळे सर्व नागरिकांना त्याचा खुप त्रास होत आहे. सगळीकडे दुर्गंधी पसरलेली आहे. शासनाने मोठा गाजावाजा करून नवीन कच-याच्या गाड्या उपलब्ध करून दिल्या. परंतु, गेली आठ दिवस त्या गाड्या वेळेवर येत नाहीत. दोन-दोन दिवस कचरा उचलला जात नाही. मोठया सोसायट्यांचा कचरासुध्दा दिवसाआड उचलला जातो. कचराकुंडी नेहमीच ओसंडून वाहतात, त्यात कचऱ्याच्या नवीन वाहनांची उंची जास्त असल्याकारणाने कचऱ्याच्या गाडीत कचरा टाकता येत नाही. कचरा गाडीवरचा मदतनीसही मदत करत नाही. तो कचरा त्या गृहिणींच्या अंगावर पडतो. स्मार्टसिटीच्या नावाचा गाजावाजा करणाऱ्या प्रशासनाला हे दिसत नाही का? सगळीकडे कच-याच्या दुर्गंधीने नागरीक आजारी पडले आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील सर्व भागात कच-याचे साम्राज्य पसरले आहे. ठेकेदार, अधिकारी व प्रशासन याला सर्वस्वी जबाबदार आहेत. ठेकदारांचे भले करण्यासाठी हा सगळा उपदव्याप चालू आहे, त्यात सर्वसामान्य नागरिक भरडले जात आहेत.
शहरातील नागरिक आपण सांगाल ते सर्व प्रकारचे कर भरतात. मग जनतेला सोयी-सुविधा दयायच्या सोडुन, प्रशासनाने ठेकेदारांवर उदार होणे सोडून दयावे. बेस्ट सिटी असलेल्या पिंपरी चिंचवड शहराची कचराकुंडी करून ठेवली आहे. सर्व पिंपरी चिंचवडमध्ये घाणीचे साम्राज्य पसरत आहे. ठेकेदार, अधिकारी व प्रशासन यांना फक्त आठ दिवसांची मुदत देत आहोत, जर नागरिकांना त्रास होत असल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापी सहन करणार नाही. आम्ही जनतेचे सेवक आहोत. यामुळे आम्ही फक्त आठ दिवसाची मुदत देत आहोत. जर आठ दिवसात प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना कुठल्याही अधिका-याला खुर्चीवर बसु देणार नाही, असे या पत्रात मनसे महिला सेनेच्या वतीने बांगर यांनी म्हटले आहे.
या पत्रावर पिंपरी चिंचवड मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष हेमंत डांगे, पिंपरी चिंचवड मनसे महिलाध्यक्षा आश्विनी बांगर, अनिता पांचाळ, सीमा बेलापूरकर, दक्षता क्षीरसागर, भाग्यश्री चिंचोळे, स्नेहल बांगर, श्रद्धा देशमुख, संगीत देशमुख, कार्यकारिणीचे सुरेश सकट, रुपेश पटेकर, मयूर चिंचवडे, चंद्रकांत दानवले, अनिल भुजबळ, राजू सावळे आदींच्या सह्या आहेत.


















