न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै २०१९) :- एचसीसी अफ्रा इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीने कामगारांच्या थकीत वेतनाची यादी महामेट्रोकडे जमा केली असून, कामगारांचे थकीत वेतन ३१ जुलैला कंपनी अदा करणार आहे, असे आश्वासन कंपनीने दिले असून, आता शब्द पाळला नाही तर ३१ जुलैपासून फुगेवाडी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करणार असा इशारा सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी महामेट्रो प्रशासनास दिला आहे. त्यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, एचसीसी अफ्रा इन्फ्रा प्रोजेक्टच्या कामगारांनी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांच्या नेतृत्वाखाली महामेट्रोचे व्यवस्थापकिय संचालक ब्रिजेश दिक्षित यांची भेट घेऊन डिंसेबर २०१८ पासून संबंधित कंपनीने कामगारांचे वेतन थकवले असून याबाबत आम्ही १ मे २०१९ पासून आंदोलन करीत आहोत. मात्र संबंधित या कंपनीने वारंवार शब्द फीरविल्यामुळे १ जून २०१९ आम्ही पुन्हा आंदोलन केले. महामेट्रो रेल प्रकल्पाच्या फुगेवाडी येथील व्यवस्थापकिय संचालक ब्रिजेश दिक्षित कार्यालयात घुसून त्यांच्या उपस्थितीत ६ जून ला आंदोलन केले. त्यावेळी आपण संबंधित कंपनीला २० जून पर्यंत कंपनीला कामगारांची यादी महामेट्रोला देण्यात यावी. ३० जून पर्यंत सर्व कामगारांचे थकीत सर्व वेतन अदा करावे. जर नाही केले तर संबंधित कंपनीच्या बँकगँरटीमधून अदा केले जाईल. असे कंपनी व्यवस्थापकाला सांगितले होते.
दरम्यानच्या काळात एचसीसी अफ्रा इन्फ्रा प्रोजेक्टचे व्यवस्थापकीय संचालक अनिल बिराजदार यांनी काही कामगारांचे थकीत वेतन २० जून रोजी अदा केली. मात्र श्री दिक्षीत यांनी कामगा-यांच्या थकीत वेतनाची यादी २० जूनला देण्याचे आदेश दिले होते. ती यादी कंपनीने जमा केली नाही. त्याच वेळी उर्वरीत सर्व थकीत वेतन कंपनी अदा करु शकणार नाही. अशी भूमिका कंपनीने घेतली. त्यावर आम्ही गुरुवार दि.२७/०६/२०१९ रोजी फुगेवाडी येथील महामेट्रोच्या कार्यालयात श्री दिक्षीत आलेले आहेत. हे समजल्यामुळे थेट फुगेवाडी कार्यालयात गेलो. त्यावेळी आपण सर्व कामगारांचे थकीत वेतन ३० जूनला अदा केले जाईल. हे पुन्हा एकदा श्री दिक्षीत यांनी आश्वासन दिले. मात्र ती ३० जूनपर्यंत कामगारांना थकीत वेतनाची दमडीही मिळालेली नाही. त्यामुळे आम्हाला नाईलास्तव मंगळवार दि.०९/०७/२०१९ रोजी फुगेवाडी येथील महामेट्रो रेल पुणे कार्यालया समोर आंदोलन केले. हे आंदोलन सकाळी ११:३० वाजता सुरु झाले. व रात्री १० वाजेपर्यंत चालले.
संध्याकाळी ६ वाजता मा.प्रशांत कुलकर्णी, महामेट्रो रेल फुगेवाडी कार्यालय. मा.अनिल बिराजदार, मे.एच.सी.सी. अल्फ्रा इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनी. भोसरी पोलीस स्टेशनचे वरीष्ट पोलीस निरीक्षक शंकर आवतडे व सामाजिक कार्याकर्ते मारुती भापकर व कामगार यांच्यात बैठक झाली. महमेट्रो व एचसीसी अफ्रा इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीने दोन लिखीत पत्र दिले. त्यामध्ये महामेट्रोने संबंधित कंपनीला ३१ जुलैपर्यंत सर्व कर्मचा-यांचे थकीत वेतन अदा करावे असे आदेश दिले. तर एचसीसी अफ्रा इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीने ज्या कामगारांनी या कंपनीत काम केलेले आहे परंतू त्यांचे वेतन थकित आहे ते कामगार आपले संपुर्ण रेकॉर्ड घेवून येवून त्याची प्रत एच.आर. ऍडमीन अधिका-याकडे जमा करावे, त्यानंतर एच. आर. अधिकारी त्यांचे संपुर्ण तपशीलाचे खातर जमा करुन त्यांचे उर्वरित रक्कम त्यांना देण्यात येईल याची काळजी आम्ही घेऊ. अश्या आशयाचे पत्र कंपनीने दिले.
त्याच बरोबर अदा केलेले थकीत वेतन, अंश:त दिलेले व काही प्रमाणात बाकी थकीत वेतन असलेल्या कामगारांची संख्या व वेतन, वरीष्ट कामगारांची संख्या व थकीत वेतन यांची वरीलप्रमाणे यादी दिली आहे. या यादीमध्ये व प्रत्येक्ष कामगारांची येणे बाकी थकीत वेतन रक्कमेत तफावत आहे. त्यामुळे पुढील आठ दिवसात कंपनी व कामगार यांनी पुराव्यासह एकत्रीत बसून अंतिम यादी पुढील दहा दिवसात बनवावी. हि अंतिम यादी महामेट्रोकडे सादर करावी. अंतिम मान्यते नंतर महामेट्रो व संबंधित कंपनी कामगारांना ३१ जुलैला ठरल्याप्रमाणे थकीत वेतन अदा करेल. जर ३१ जुलैला ठरल्याप्रमाणे सर्व उपस्थित कामगारांचे थकीत वेतन अदा झाले नाही. तर ३१ जुलैपासून महामेट्रो रेल प्रोजेक्ट फुगेवाडी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन केले जाईल, असे भापकर यांनी या पत्रकात म्हटले आहे.
पत्रातील ठळक मुद्दे :-
- पुर्ण थकित वेतन मिळालेले कामगारांची संख्या-४७
- अंश:त दिलेले व काही प्रमाणात बाकी असलेल्या कामगारांची संख्या-२८.(यांचे उरलेले थकित रक्कम ३१ जुलैपर्यंत देणार आहोत.)
- अंश:त दिलेले व काही प्रमाणात शिल्लक असलेले वरिष्ट कामगारांची संख्या-०९,(यांचे थकित वेतन ३ टप्प्यात देण्यात येईल.)
- वादग्रस्त कामगारांची संख्या ०४. (या कामगारांनी कंपनीच्या कार्यालयात मुंबई येथे जाऊन त्यांचे वैयक्तिक कंपनीसोबत असलेले वाद मिटवून घेवून त्यांचा पगार कधी मिळेल याची तारीख कंपनीच्या मुख्यालयातून घ्यावी.)












