- चिखलीत भव्य मेळावा, महिला व युवा कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०१९) :- भोसरी मतदारसंघातील गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दीड कोटींची मदत करण्यात आली. मोशीतील कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प मार्गी लावला. चिखलीत संतपीठा साठी जागा ताब्यात घेऊन त्याचे काम सुरु केले. देहू आळंदी, पुणे-आळंदी बीआरटी रस्ता सुरु केला. शहरातील सर्व एक हजार स्क्वेअर फूट अनधिकृत बांधकामाचा शास्तीकर माफ केला. समाविष्ट गावातील नागरिकांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी चिखलीत शंभर एमएलडीचा जलशुद्धीकरण प्रकल्प बांधण्यात येत असून त्यातील पाणी केवळ चार गावांसाठी देण्यात येणार आहे. त्यामुळे समाविष्ट गावातील वाढत्या लोकसंख्येच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल, असे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून चिखली ग्रामस्थांच्या वतीने परिसरातील कार्यकर्त्यांचा इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयात भव्य विजयी संकल्प मेळावा गुरुवारी (दि. २७) घेण्यात आला. यावेळी महापौर राहुल जाधव, माजी नगरसेवक सुरेशतात्या म्हेत्रे, राष्ट्रवादी कॉंग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष आनंदा यादव, महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती स्विनल म्हेत्रे, नगरसेविका साधना मळेकर, सभापती गीताराम मोरे, माजी उपसरपंच यशवंत साने, युवा कार्यकर्ते तुकाराम मोरे, जितेंद्र यादव आदींसह हजारो महिला व चिखलीगावातील सर्वपक्षीय नेते, युवा कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच यावेळी हवेली पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेवा दलाचे अध्यक्ष आनंदा यादव, पंडीत मोरे, रोहिदास मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
आ. लांडगे म्हणाले, आज गावातील प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते एका व्यासपीठावर येतात. त्यामुळे ख-या अर्थाने विजयी झाल्यासारखे वाटते. फक्त राजकारणाने लोक जवळ येत नाहीत तर प्रेमाने आणि आपुलकीने जवळ येतात. चिखलीगावाला वारकरी सांप्रादयाची मोठी परंपरा आहे. आम्ही भोसरीत आदरयुक्त राजकारण चालू केले आहे. भोसरी मतदारसंघात निवडून आलेले नगरसेवक ध्येयाने वेडे झाले आहेत. जबाबदारी पार पाडण्यासाठी ते अहोरात्र झटत आहे, असे आ. लांडगे म्हणाले.
महापौर राहुल जाधव म्हणाले, “आ. लांडगे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेत महापौर पदावर काम करताना समाविष्ट गावांना मोठ्या प्रमाणात विकास कामे करुन न्याय दिला. चिखली, तळवडे, च-होली, मोशी, डुडूळगावाचा आणखी वेगाने विकास होईल. व्हिजन 20-20 अंतर्गत पुढील 25 वर्षांचे नियोजन केले आहे. आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी आणून जलशुद्धीकरण केंद्र चिखलीत सुरु केले आहे. चिखलीला संताची परंपरा असून या गावात भव्य असे संतपीठ करण्यात येत आहे”
सभापती गीताराम मोरे म्हणाले, “आमदार महेश लांडगे कार्यकर्त्यांना ताकद देतात. त्यांच्या मागे कार्यकर्त्यांची मोठी ताकद आहे. आ. लांडगे यांनी चिखलीकरांना काहीच कमी पडू दिले नाही. कामाचा डोंगर उभा केला आहे. चिखलीकरांना महत्वाची पदे दिली आहेत. चिखलीतील सामान्य शेतकरी कुटुंबातील युवा नगरसेवकाला शहराचा महापौर केले. त्यामुळे चिखलीतील नागरिक दादांना काही कमी पडून देणार नाहीत.”
माजी उपसरपंच यशवंत साने म्हणाले, “हा मेळावा चिखलीच्या इतिहासात नोंद घेण्यासारखा आहे. जुन्या नव्या कार्यकर्त्यांचा मिलाफ झाला आहे. ज्येष्ठ नागरिक संघासाठी दादांनी कार्यालय दिले आहे. आम्ही ज्येष्ठ नागरिक दादांसोबत आहोत. चिखलीकरांसाठी भरपूर दिले आहे. आता आमची वेळ आहे. आम्ही सव्वा लाखांच्या मतांच्या फरकाने आ. महेश लांडगे यांना निवडून देण्याचा संकल्प जाहिर केला आहे.’’
जितेंद्र यादव म्हणाले, “आमदार महेश लांडगे यांनी ‘व्हीजन २०-२०’ अंतर्गत कामे केली आहेत. भोसरी मतदारसंघाला एक कुटुंब म्हणून संपुर्ण मतदारसंघात विकासकामे केली आहेत. पाच वर्षांत लावलाय जोर, महेशदादा आमदार वन्समोर असे सांगत स्वीनल म्हेत्रे म्हणाल्या, खूप अफवा पसरविल्या जातात. अफवांना कोणीही बळी पडू नये. साधना मळेकर म्हणाल्या, धार्मिक ठिकाण असलेल्या चिखली गावात संतपीठ होत आहे. कमानीचे काम केले. पाण्याच्या प्रश्न सोडविण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात येत आहे. विकास पुरुष आमदार सव्वा लाखाच्चा फरकाने निवडून देणार आहोत.”


















