-
प्रवीण उर्फ बाळासाहेब गायकवाड यांच्या उमेदवारीने पिंपरी वंचितमय
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑक्टोबर २०१९) :- पिंपरी विधानसभा हा राखीव मतदारसंघ आहे. वंचित बहुजन आघाडीनं या मतदार संघातून प्रवीण उर्फ बाळासाहेब गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून गायकवाड यांनी हा मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला आहे. गायकवाड यांच्यापुढे महायुतीचे उमेदवार व विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार तसेच राष्ट्रवादीचे उमेदवार व माजी आमदार अण्णा बनसोडे याचे आव्हान आहे.
या मतदारसंघात बौद्ध, आदिवासी, लोहार, कुंभार, न्हावी आदी वंचित सामाजिक घटकांचा मोठा वावर आहे. या मतदारसंघाने विद्यमान व माजी या दोन्ही आमदारांचा कार्यकाल जवळून पहिला आहे. गेल्या पाच वर्षात विद्यमान आमदार या मतदारसंघाकडे फिरकलेसुद्धा नाहीत, अशी कुजबुजही नागरिकांमध्ये सुरु होती. याच पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीवेळी वंचित आघाडीस पिंपरी मतदारसंघातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. नेहमी परिवर्तनासाठी ओळखला जाणार हा मतदारसंघ यावेळी गायकवाड यांच्या पाठीशी राहणार, अशी चर्चाही मतदारसंघात सुरु आहे.
प्रकाश आंबेडकरांना मानणारा मोठा जनसमुदाय या मतदारसंघात आहे. वंचितचे उमेदवार गायकवाड हेही आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवार आहेत. नेते प्रकाश आंबेडकर यांची एक जाहीर सभा या उमेदवारासाठी झाल्यास पिंपरी विधानसभेचा निकाल फिरवणारी ही सभा असेल, असा अनेकांनी कयास वर्तविला आहे. तसेच, गायकवाड हेही दलित-मुस्लिम मतांची मोट बांधण्यात वाकबगार आहेत. वंचितचाच उमेदवार जिंकू शकतो हे मुस्लिम आणि दलित मतांवर बिंबवल्यास गायकवाड यांचा विजय नक्कीच आहे.
तसेच गायकवाड यांनी बाईक रॅलीच्या निमित्ताने मतदारसंघातील वातावरण वंचितमय केले असून, या रॅलीला आयु. सुजात प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थित होती. मतदारसंघात घरोघरी सिलेंडर हे चिन्ह पोहोचवले जात आहे. त्यामुळे यंदा ‘पिंपरीत सिलिंडरचा स्फोट होणारच हाय, अनं वंचितचा उमेदवार निवडून येणारच हायं, अशी टॅगलाईन सर्वत्र पहावयास मिळत आहे.















