न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑक्टोबर २०१९) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी शुक्रवारी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
पिंपरीतील शिवसेना उमेदवार गौतम चाबुकस्वार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बहिरवाडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव, मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, उपनेते रवींद्र मिर्लेकर, सहसंपर्कप्रमुख इरफान सय्यद उपस्थित होते.
प्रा. रामकृष्ण मोरे यांचे बहिरवाडे खंदे समर्थक होते. १९९७ साली पहिल्यांदा ते चिंचवड स्टेशन प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. २००२ मध्ये झालेल्या तीन सदस्यीय निवडणुकीत ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांच्या पॅनलचा बहिरवाडे यांनी दारुण पराभव केला होता. ऐतिहासिक निवडणूक झाली होती. खासदार श्रीरंग बारणे यांच्या गाजलेल्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीची संपुर्ण व्युहरचना बहिरवाडे यांनी आखली होती. काँग्रेसचे बहुमत नसताना बारणे यांना स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवडून आणले होते.
बहिरवाडे २००८ साली रुपी-को-बँकेचे संचालक म्हणून सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले होते. २०१२ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून शाहूनगर, संभाजीनगर प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. नगरसेवकपदाच्या २० वर्षाच्या काळात अनेक विकासकामे केली.















