न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑक्टोबर २०१९) :- चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपा – शिवसेना महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारानिमित्त आज (दि. १३) रोजी ग्रामविकासमंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची थेरगाव येथे सभा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, महापौर राहुल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार, सदाशिव खाडे उपस्थित होते.
पंकजा मुंडे यांचे भाषण सुरू असताना सभेतील काही महिलांसह नागरिकांनी पिंपरी – चिंचवड शहरातील अवैध बांधकामे, रिंग रोड आणि शास्तीकर या मुद्याकडे मुडे यांचे लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न केला. रिंगरोडचा प्रश्न सुटला पाहिजे. तसेच रिंग रोडमुळे अनेकांची घरे बाधित होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्येकाला घर मिळाले पाहिजे असे म्हणतात. इथे मात्र आमच्या घरांवर हातोडा मारून आम्हाला बेघर केले जात आहे. अवैध बांधकामे, शास्तीकर १०० टक्के रद झाला पाहिजे, अशी सभेला उपस्थित असलेल्या महिलांनी मागणी केली.
गोंधळ सुरू असताना देखील पंकजा मुंडे यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. तुमच्यावर दुसऱ्या पक्षाची छाप आहे, असा आरोप मुंडे यांनी करताच आम्ही कोणत्या पक्षाचे नसल्याचे नागरिकांनी त्यांना ठणकावून सांगत आम्हाला कोणी पाठविले नाही, असे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर शांत राहा शांत राहा लोकशाहीत हे घडणे अपेक्षित आहे. घराचा प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे पकजा मुडे यांनी सांगितले.












