न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड :- चिंचवड नवरात्र उत्सवानिमित्त अपर्णाताई रामतीर्थकर यांचे “कुटुंबातील संवाद आणि नातेसंबंध” या विषयावर व्याख्यान आयोजित केले गेले होते. त्याप्रसंगी मधु जोशी, संस्कृती संवर्धन समितीचे किसन महाराज चौधरी, डॉ. अजित जगताप, शोभा जोशी, गायत्री परिवारचे राजेंद्र देसले, इनामदार सामाजिक संस्थेचे इनामदार, सुहास घुमरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कुटुंबातील संवाद आणि नातेसंबंध या विषयावर बोलताना अपर्णाताई म्हणाल्या, “इतिहासात अनेक घडामोडी नंतरही भारतीय संस्कृती आजतागायत टिकून आहे. याचे मूळ कारण म्हणजे आपली कुटुंबव्यवस्था. आधुनिकतेच्या नावाखाली आपली संस्कृती लोप पावत चालली आहे. आधुनिकतेबरोबर आपली संस्कृती, परंपरा ह्या जपल्याच पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. शेवटी त्या म्हणाल्या, “चिंचवड नवरात्र महोत्सवात राम मंदिरात आदिशक्तीची स्थापना करून अयोध्येतील राममंदिर उभारणीचा एक शुभ संकेतच दिला आहे.”
त्यानंतर संस्कृती संवर्धन विकास महासंघ, गायत्री परिवार, पतंजली योग समिती, विश्व हिंदू परिषद, इनामदार सामाजिक संस्था यांच्या १२७ महिला सदस्यांनी एकत्र येऊन श्रीसूक्त पठण व कुंकुमार्जन केले. त्यानंतर मंगळागौर ग्रुप आनंदवन, रणरागिणी, गीताई यांनी पारंपारिक पण सामाजिक संदेश देणारे मंगळागौरीचे खेळ सादर केले. यात वेगवेगळ्या सरकारी योजना, नदी प्रदूषण, ओला कचरा-सुका कचरा, महिला सबलीकरण आदी विषयानुसार सादरीकारण केले. मीना पोकर्णा, विद्या दंडवते, कानिटकर यांनी मंगळागौर परीक्षक म्हणून काम पहिले.
त्यानंतर महाभोंडला साजरा केला गेला. जवळपास २५० महिला पारंपारिक वेशात महाभोंडल्यात सहभागी झाल्या होत्या. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी स्वागत केले. नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनी प्रास्ताविक केले. रेणुका बारसावडे यांनी आभार मानले.















