न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी प्रतिनिधी :- प्रभाग क्र २७ काळेवाडी राहटणीतील आदिनाथ कॉलनीमध्ये पालिकेने चालु केलेल्या ड्रेनेज लाईनच्या दुरूस्तीचे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी प्रशासनास शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे.
‘ग प्रभाग’ क्षेत्रीय प्रशासन अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी गेल्या काही दिवसांपासून स्थापत्य (ड्रेनेज दुरूस्ती विभागाकडुन) श्रीनगरमधील आदिनाथ कॉलनीमध्ये ड्रेनेज दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आलेले आहे. कामाच्या दिरंगाईमुळे कॉलनीतील महिला, जेष्ठ नागरिक व शालेय विद्यार्थीं यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे, तसेच परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून साथीच्या रोगांना आयतेच निमंत्रण मिळत असल्याचे निदर्शनास आलेले आहे.
त्यामुळे प्रशासनाने प्रभागातील ड्रेनेज लाईनचे काम तात्काळ पूर्ण करावे, अन्यथा खोदकाम केलेल्या जागी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल, असे शिवसेनच्या काळेवाडी-रहाटणी प्रभागाच्या वतीने निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे.
यावेळी शिवसेना तिरोडा मतदार संघाचे संपर्कप्रमुख युवराज दाखले, रहाटणी उपविभागप्रमुख प्रदिप दळवी, रहाटणी शाखा प्रमुख अंकुश कोळेकर आदी उपस्थित होते.