न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑक्टोबर २०१९) :- चिंचवड विधानसभा मतदार संघात भाजपाचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी विजयश्री खेचून आणत प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचा पराभव केला आहे.
शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी जोरदार टक्कर देत विजयासाठी जगताप यांना अखेरपर्यंत झुंजवत ठेवले होते.
मात्र, अतितटीच्या लढतीत जगताप यांनी कलाटे यांचा ४०,००० मतांनी पराभव केला आहे. आमदार जगताप यांनी चिंचवड मतदारसंघ तिसऱ्यांदा राखीत विजयाची हॅट्रीक केली आहे. चिंचवड मतदार संघात केलेला विकास हाच निवडणुकीत त्यांचा मुख्य मुद्दा होता.
चिंचवडमध्ये दोन लाख ७६ हजार ९२७ पुरुष आणि दोन लाख ४१ हजार ९८० महिला आणि इतर ३२ असे एकूण पाच लाख १८ हजार ३०९ मतदार आहेत. त्यापैकी एक लाख ५४ हजार ५५० पुरुष आणि एक लाख २३ हजार १९८ महिला आणि इतर एक अशा दोन लाख ७७ हजार ७५० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला आहे. ५३.५९ टक्के मतदानाची नोंद झाली होती.
भाजपचे लक्ष्मण जगताप यांना एक लाख ५० हजार ४८८ आणि पोस्टल २३५ अशी एक लाख ५० हजार ७२३ मते मिळाली. ३८ हजार ४९८ मतांनी ते विजयी झाले आहेत. तर, अपक्ष राहुल कलाटे यांना एक लाख ११ हजार ९९४ आणि पोस्टल २३१ अशी एक लाख १२ हजार २२५ दुस-या क्रमांकाची मते मिळाली आहेत. तर, नोटाला म्हणजेच वरीलपैकी एकही नाही तिस-या क्रमाकांची ५ हजार ८६८ मते मिळाली आहेत.















