- भोसरी मतदारसंघात चर्चांना उधान….
- कार्यकर्त्यांचीही पुन्हा गुलाल उधळण्याची तयारी!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ नोव्हेंबर २०१९) :- भोसरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार महेश लांडगे यांना नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघातील जनतेनं मोठ्या मताधिक्क्याने दुसऱ्यांदा आमदारपदी विराजमान केलं आहे. त्यांनी भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे यांचा तब्बल ७७३७९ मताधिक्क्याने दणदणीत पराभव केला. या निकालाने लांडगे यांनी मतदारसंघातील राष्ट्रवादी व इतर पक्षीयांचा उरलासुरला विरोधही मोडीत काढला असून, माजी आमदार विलास लांडे यांच्या राजकीय कारकीर्दीस पूर्णविराम देत त्यांना स्वेच्छयानिवृत्ती घेण्यास भाग पाडले असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे मतदारसंघातील कार्यकर्त्यांना मंत्रिपदाचे वेध लागले आहेत.
आमदार महेश लांडगे यांनी गेल्या पाच वर्षात व्हीझन २०-२० च्या माध्यमातून मतदारसंघात विविध विकासात्मक कामे मार्गी लावली. महापालिका निवडणुकीत मतदारसंघात भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आणले. समाविष्ट भागातील नगरसेवकांना महापालिकेतील विविध विभागात महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या. गेली दोन टर्म समाविष्ट भागातील नगरसेवकांना महापौरपदी विराजमान केले.
भोसरीसह समाविष्ट भागात विकासाची गंगा आणून कायापालट करण्याची मोठी जबाबदारी आमदार लांडगे यांनी नेटाने पूर्ण केली. या सर्व बाबींचा परिपाक म्हणूनच मतदारसंघातील जनतेनं त्यांना पाऊन लाखापेक्षा अधिक मताधिक्क्याने निवडून आणलं. त्यामुळे आता पिंपरी चिंचवड शहरातून आमदार लांडगे हेच मंत्रीपदाचे प्रबळ दावेदार असल्याची चर्चा होऊ लागली आहे. येत्या ५ नोव्हेंबर रोजी म्हणजेच मंगळवारी वानखेडे स्टेडियमवर भाजपा मंत्रीमंडळाचा शपथविधी समारंभ पार पडणार असल्याची माहिती शासनातील वरिष्ठ सूत्रांनी दिलीय. त्यामुळे कार्यकर्त्यांकडूनही येत्या ५ नोव्हेंबर रोजी मंत्रीमंडळाच्या शपथ विधीस मुख्यमंत्र्यांकडून आ. महेश लांडगे यांनाच बोलावनं येईल, असा विश्वास व्यक्त होऊ लागला आहे.















