न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ नोव्हेंबर २०१९) :- शहरात नव्याने झालेल्या अनधिकृत बांधकामांच्या विरोधात धडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामध्ये कोणाचीही हयगय केली जाणार नाही. पोलीस बंदोबस्त मिळाल्यानंतर लगेचच ही कारवाई सुरू केली जाईल, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी स्पष्ट केले.
शहरामध्ये विधानसभा निवडणुकांच्या काळात नव्याने अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. महापालिका अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त होते. निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू होती. याचा फायदा घेत नागरिकांनी अनधिकृत बांधकामे केली. दरम्यान अयोध्या प्रकरणाचा निकाल नुकताच आला. त्यानिमित्त शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी महापालिकेला पोलीस बंदोबस्त उपलब्ध होऊ शकला नव्हता. तथापि, आता पोलीस बंदोबस्त मिळाल्यानंतर महापालिकेकडून लगेचच कारवाई सुरू केली जाणार आहे.
वाकड, दत्त मंदिर रस्ता येथे २ नोव्हेंबरला महापालिका प्रशासनाकडून अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली. त्यामध्ये केवळ बाळकृष्ण कलाटे आणि अजय कलाटे यांच्या पत्राशेडवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई राजकीय द्वेष आणि सूडबुद्धीने केल्याचा आरोप शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केला होता. याबाबत पत्रकारांनी आयुक्तांकडे विचारणा केली असता ते म्हणाले, महापालिका प्रशासन कोणत्याही व्यक्तीचा चेहरा पाहून कारवाई करीत नाही. दरम्यान, याबाबत येत्या सात दिवसांमध्ये चौकशी करण्याचे आदेश सह-शहर अभियंता मकरंद निकम यांना दिले आहेत.















