- माजी नगरसेवक किरण मोटे यांचा प्रभाग अधिकाऱ्यांना सवाल
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ नोव्हेंबर २०१९) :- यंदा पावसाने शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण केली. मात्र, त्यापेक्षा दिरंगाई पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रशासनाने केली आहे. परतीच्या पाऊसाची वाट सरूनही महापालिका प्रशासनाने शहरातील खड्डेयुक्त रस्ते पूर्वरत केलेले नाहीत. कासारवाडीत ‘ ह ‘ क्षेत्रीय कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था होऊनही खड्डे बुजवण्याकामी प्रशासन अजनूही निद्रिस्त अवस्थेत आहे. या भागातील खड्डे त्वरित बुजवण्याची मागणी माजी नगरसेवक किरण मोटे यांनी ‘ ह ‘ प्रभाग अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक ३० मध्ये रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली आहे. आपल्या प्रभाग कार्यालयात येण्यासाठी शंकरवाडी ते पिंपळे गुरव रस्त्यावर सर्वात जास्त खड्डे पडलेले आहेत. या ठिकाणी मोठा अपघात होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी पंचाग पाहणार?
अशी कोणतीही दुर्घटना झाल्यास यास आपले प्रशासनच जबाबदार राहील. आपण तात्काळ या प्रश्नी लक्ष घालून संबंधित रस्त्यांचे खड्डे बुजवून रस्ता पूर्वरत करावा, अन्यथा न्यायालयात दाद मागावी लागेल, असे या निवेदनात माजी नगरसेवक किरण मोटे यांनी म्हटले आहे.















