- पदाधिकारी किंवा नगरसेवकांने विरोध केल्यास नियमानुसार कारवाई
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० नोव्हेंबर २०१९) :- निवडणूक काळात पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत. त्या बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश बांधकाम परवानगी, अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभागास दिले आहेत. पिंपरी – चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा फायदा घेऊन त्या काळात शहरात मोठ्या संख्येने अनधिकृत बांधकामे झाली आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनावर ताण वाढत आहे. एक जानेवारी २०१६ पासूनच्या सर्व अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश संबंधित विभागास दिले आहेत. सर्व अनधिकृत बांधकामांना नोटीसा द्याव्यात. त्या इमारतीवर नोटीसा चिकटविल्या गेल्या पाहिजेत. असे न केल्यास बीट निरीक्षक, उप अभियंता, अभियंता प्रसंगी कार्यकारी अभियंत्यांवर प्रशासकीय कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
या कारवाईत भेदभाव किंवा हयगय केली जाणार नाही. पालिकेच्या कोणत्या पदाधिकारी किंवा नगरसेवकांने विरोध केल्यास आहेत त्यांच्यावरही नियमानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे. दरम्यान, वाकड येथील अनधिकृत दोन पत्राशेडवर २ नोव्हेंबरला झालेल्या कारवाईचा चौकशी अहवाल सह शहर अभियंता मकरंद निकम यांच्याकडून प्राप्त झाला असून, त्याचा अभ्यास करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.















