- १६ महिन्यांच्या कार्यकाळात तब्बल १५ सर्वसाधारण सभांचे अध्यक्षस्थान भूषविले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० नोव्हेंबर २०१९) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेचे महापौर राहुल जाधव यांचा कार्यकाळ उद्या गुरुवारी (दि. २१) रोजी संपत आहे. त्यामुळे बुधवारी (दि. २०) रोजी त्यांच्या अध्यक्षतेखाली होणारी सर्वसाधारण सभा महापौर म्हणून अखेरची सभा असणार आहे. महापौरपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ १४ सप्टेंबरला संपणार होता. मात्र, विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन राज्य शासनाने २२ ऑगस्टला राज्यातील सर्व महापालिकेच्या महापौरांना २१ नोव्हेंबरपर्यंत ३ महिन्यांची मुदत वाढ दिली. ही मुदत गुरुवारी संपत आहे.
४ ऑगस्ट २०१८ ला नगरसेवक राहुल जाधव हे महापौरपदी विराजमान झाले होते. त्यांचा कार्यकाळ २१ नोव्हेंबरला संपत आहे. या १६ महिन्यांच्या कार्यकाळात महापौर जाधव यांनी सुमारे १५ सर्वसाधारण सभांचे अध्यक्षस्थान भूषविले. नवीन महापौर निवडीसाठी विशेष सभा शुक्रवारी (दि. २२) रोजी आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, पिंपरी – चिंचवड महापालिकेची नियमित सभा आज बुधवारी दुपारी दोन वाजता होत आहे.
ऑक्टोबर महिन्याची तहकूब सभा आज दुपारी दीड वाजता आहे. या दोन्ही सभा महापौर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होतील. या सभा महापौर जाधव यांच्या शेवटच्या सभा असतील.















