न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० नोव्हेंबर २०१९) :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानव्यविद्याशाखांतर्गत दिली जाणारी कला विद्याशाखेची ‘पीएच.डी. (विद्यावाचस्पती) पदवी प्रा. सौ. सुलभा मोहिते यांना नुकतीच जाहीर झाली. विद्यापीठाच्या ‘ज्येष्ठ नागरिक’ या वर्गामधून त्यांनी ‘मराठीतील संत कवयित्रींच्या अभंगातील संवादतत्व’ या विषयातील प्रबंध विद्यापीठास सादर केला आहे. त्यांना पीएच.डी. प्रबंधासाठी अहमदनगर जिल्ह्यातील अकोला येथील अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्करराव शेळके यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले आहे.
प्रा. सौ. सुलभा मोहिते यांची आळंदी येथील श्री.ज्ञानेश्वर विद्यालय आणि जनता शिक्षण संस्था यांच्या दापोडी व औंध माध्यमिक विद्यालयात ३६ वर्षांपेक्षा जास्त काळ अध्यापन सेवा झाली आहे. त्यांनी राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मॉरिशस, मॉस्को, दुबई इत्यादी ठिकाणी शोधनिबंध सादर केलेले आहेत. तसेच त्यांनी बालचित्रवाणी पुणे येथे नाट्यसंहितालेखन, पट्कथालेखन केले असून ‘वाणी’ या प्रकारात प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी अनेक वर्षे इयत्ता ११ वी व १२ वी च्या परीक्षांचे ‘परीक्षक’, ‘परीक्षा नियामक ‘, एस.एस.सी., एच. एस.सी. अभ्यासक्रम पुनर्रचना, नाट्यस्पर्धांचे ‘परीक्षक’ म्हणून काम पाहिले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहिःशाल शिक्षण मंडळाच्या माध्यमातून त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी अनेक व्याख्याने दिलेली आहेत. पुणे म.न.पा., पिंपरी- चिंचवड म.न.पा., पुणे जिल्हा परिषद, भारतीय जैन संघटना, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ व इतर स्थानिक पातळीवर त्याना अनेक ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ मिळाले आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी बालचित्रवाणी, अपंग सैनिकांसाठी रक्षाबंधन,सैनिकांच्या मुलाखती असे अनेक उत्तम कार्यक्रम व उपक्रम राबविले आहेत. त्यांनी सेवानिवृतीनंतर ‘पी. एच. डी.’ मिळवली, त्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.


















