न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०१९) :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातील सरनाम्यामध्ये घटना स्वत:प्रत अर्पण करुन भारताच्या प्रत्येक नागरिकाला संविधानाचे सदस्यत्व आणि संविधान निर्मात्याचे स्थान दिले असल्याचे मत संविधानाचे अभ्यासक व्याख्याते डी. के. देसाई यांनी
व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने मंगळवार दि. २६ नोव्हेंबर २०१९ रोजी सायं. ०६.०० वाजता पिंपरी येथे संविधान दिनानिमित्त भारतीय संविधान विश्वात महान या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगरसदस्य सागर अंगोळकर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, सेवानिवृत्त सह शहर अभियंता रविंद्र दुधेकर, शरद जाधव, वसंत साळवी आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डी. के. देसाई म्हणाले, ३९५ कलमांचे जगातले सर्वात मोठे संविधान आहे. संविधान तयार करताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यातील प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य आणि प्रत्येक ओळीसाठी संघर्ष केला आहे. कोणत्याही चार व्यक्तींना एकत्र आल्यानंतर आम्ही एकत्रित कसे राहणार आहोत आणि एकमेकांशी व्यवहार कसा असणार आहे यासाठी करार करुन सामंजस्य निर्माण करण्याचे काम संविधानाने केले आहे. संविधानाने भारताच्या प्रत्येक नागरिकाला समान संधी, समान हक्क प्रदान केले आहेत. समाजाच्या कल्याणाच्या आणि विकासाच्या तरतुदी संविधानामध्ये असून वैज्ञानिक दृष्टीकोणाचा प्रसार आणि विचार करण्याचा हक्क संविधानाने आपल्याला दिला असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
मंगळवार दि. २६/११/२०१९ रोजी सकाळी सायं. ४.०० वाजता स्वप्नील पवार, शेखर गायकवाड व अशोक निकाळजे यांचा प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर सायंकाळी ६.०० वाजता नगरसदस्य सागर अंगोळकर, नगरसदस्या अनुराधा गोरखे यांच्यासोबत उपस्थित नागरिकांनी संविधान प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन केले. त्यानंतर रात्री ७.०० वाजता सुप्रसिध्द पार्श्वगायिका रेश्मा सोनावणे, पार्श्वगायक रोमियो कांबळे, राखी चौरे व आकाश कांबळे यांच्या देशाची शान भारताचे संविधान या संविधान जनजागृतीपर प्रबोधनात्मक कार्यक्रमाने सांगता करण्यात आली.















