न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- चिखली येथील वीर अभिमन्यू फ्रेंड सर्कल सार्वजनिक मंडळाच्यावतीने दसऱ्या निमित्त रावण दहनाचा कार्यक्रम उद्या गुरुवारी दि. १८ सांयकाळी ६ वाजता साने चौक येथे होणार आहे. यावेळी सिनेअभिनेता डॉ.अमोल कोल्हे व सिनेअभिनेत्री प्राजक्ता गायकवाड उपस्थित होणार असल्याची माहिती महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतीचा शास्तीकर हा नागरिकांसाठीचा कळीचा मुद्दा बनला असून, या प्रश्नी सत्ताधारी व प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेऊन नागरिकांना वेठीस धरीत आहेत.
त्यामुळे या जुलमी, अन्यायी शासनास धडा शिकवण्याची वेळ आली असून, प्रशासनाने शहरातील नागरिकांना पाठविलेल्या शास्तीच्या नोटिसांची होळी करून, दसऱ्याच्या निमित्ताने ‘शास्तीरूपी प्रतीकात्मक रावण दहन’ करणार असल्याचे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सत्तेवर आल्यानंतर १०० दिवसांत रेड झोन, शास्तीकराचा प्रश्न सोडवू असे आश्वासन देऊन, पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाने सत्ता मिळविली. परंतु दोन वर्षानंतरही दोन्ही प्रश्न सुटले नाहीत त्यामुळे सत्ताधाऱ्यांचे केवळ ‘गाजर देखो भाई गाजर’ असा कार्यक्रम चालू असून यामुळे नागरिकांची फरफट होत आहे.
















