- जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ डिसेंबर २०१९) :- आज ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती, डायमंड जैन सोशल ऍक्टिव्हिटी ग्रुप पिंपरी चिंचवड शहर व माँ जगदंबा इंग्लिश मिडीयम स्कूल देहू – वात्सल्य दिव्यांग फौंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने जगतगुरु संत तुकोबारायांच्या देहूनगरी येथे “दिव्यांग सन्मान प्रभात फेरीचे” आयोजन करण्यात आले होते.
सकाळी ९.३० वाजता देहू महाप्रवेशद्वार येथून सन्मान प्रभात फेरीचे उदघाटन देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे राज्य अध्यक्ष विजय पाटील, जैन सोशल ग्रुपचे विजय मुनोत,संतोष छाजेड, अशोक नहार यांचे हस्ते करण्यात आले.या प्रसंगी वात्सल्य दिव्यांग संस्थेच्या प्रमुख सौ.वृषाली देवतरासे ,विलास देवतरासे, प्रमोद ठोंबरे उपस्थित होते. प्रभात फेरीनंतर सर्व दिव्यांग विद्यार्थ्याना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप प्रमुख पाहुण्यांच्या वतीने करण्यात आले. सर्व विद्यार्थी, शिक्षक यांना अल्पोपहाराची सोय समिती व जैन सोशल ग्रुप च्या वतीने करण्यात आली. प्रभात फेरीच्या वेळी विविध घोषणांनी देहू परिसर दुमदुमला.
या प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर म्हणाले,” दिव्यांग विद्यार्थ्याच्या पालकांना त्यांच्या अपंगत्वामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असते परंतु समाजातील प्राधिकरण नागरी सुरक्षा समिती,जैन सोशल ग्रुप व वात्सल्य फौंडेशन सारख्या सामाजिक जाणिव असलेल्या संस्थामुळे या विद्यार्थ्याना मदत मिळते व त्यांना अनेक अडचणींवर मात करता येते. जागतिक दिव्यांग दिन मोठया प्रमाणात साजरा होणे आवश्यक आहे.”
जैन सोशल ग्रुप चे विजय मुनोत म्हणाले,” आपल्या पिंपरी चिंचवड शहरात अनेक दिव्यांग प्रतिभाशाली विद्यार्थी अपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत त्यांना शैक्षणिक मदत करण्यासाठी येत्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात आर्थिक शिष्यवृत्ती मदत उभारणीचे काम आमच्या संस्थेकडून सुरू आहे.त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक अडचण दूर होईल.”
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” पिंपरी चिंचवड शहरात दिव्यांगांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.परंतु सरकारी मदत त्यांच्यापर्यंत पोहचण्यास त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते, कागदपत्रे व लाल फितीच्या कारभाराचा फटका दिव्यांग विद्यार्थ्यांना बसतो.या करिता आयुक्तांनी “विशेष दिव्यांग मदत सप्ताहाची” योजना राबवावी म्हणजेच सर्वोपोतरी मदत त्यांना मिळू शकेल.” यमुनानगर येथील दिव्यांग शाळेतही ३६ विद्यार्थ्याना खाऊचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम श्री संजय साळुंके सर,वर्षा घाडगे, आशा जाधव, वृषाली आढाव,भरत भुजबळ,गिरीश निकम यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.शीतल चव्हाण यांनी केले सौ.अश्विनी पंचभाई यांनी आभार मानले.















