- शिवसेना गटनेते राहुल कलाटे व राष्ट्रवादीचे मयूर कलाटे यांच्या आवाजाने स्थायी सभागृह दणाणले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ डिसेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची नियोजित बैठक आज बुधवारी (दि. ४) रोजी आयोजित केली होती. य बैठकीच्या अध्यक्षस्थानी सभापती विलास मडिगेरी होते. यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सभापतींना धारेवर धरले. सभापती विलास मडेगिरी यांनी ‘ प्री – मिटींग ‘ न घेताच स्थायीची बैठक सुरू केल्याने सभागृहातील वातावरण चांगलेच तापले.
‘ प्री – मीटिंग ‘ घ्यायची नसेल तर या सभागृहात विषयांचे प्रस्ताव पूर्णपणे वाचून दाखवा. सदस्यांना विषय समजले पाहिजेत. नुसतं ‘ तहकब आणि ‘ मंजूर अशा पद्धतीने सभागृह आम्ही चालू देणार नाही, अशी भूमिका शिवसेनेचे राहुल व राष्ट्रवादीचे मयूर कलाटे यांनी घेतली. त्यावर ” मी माझ्या पद्धतीने सभागृहाचे कामकाज चालविणार ” असे वक्तव्य सभापती विलास मडेगिरी यांनी केले.
त्यावरून राहुल कलाटे आणि मयूर कलाटे आक्रमक झाले. “दादागिरी करू नका, अरेरावीची भाषा कदापि खपवून घेणार नाही. कायद्यानेच सभागृह चालवावे लागेल, अशाच पध्दतीने काम करायचयं तर स्थायीतील टक्केवारीच बंद करा, इथे जे काही तुम्ही करतायं हे जनतेला समजले पाहिजे, या सभागृहातील बैठकीचे लाईव्ह प्रक्षेपण झाले पाहिजे ” असा सूर राहुल कलाटे यांनी धरला. मयूर कलाटे यांनी ही सभाच तहकूब करण्याची सूचना केली. भाजपचे सदस्य शितल शिंदे यांनी सहमती दर्शवत सभा तहकूब करण्याची सूचना केली. त्यानंतर सभापती विलास मडेगिरी यांनी (दि. ११) रोजीपर्यंत सभा तहकूब केली.












