- कलारंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांची माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० डिसेंबर २०१९) :- देशातील राजकीय, साहित्यिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील सुसंस्कृत नेतृत्त्व शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त कलारंग प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवारी (दि. १२) रोजी संध्याकाळी ५ वा. चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात पिंपरी चिंचवड शहरातील नाट्य, कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ मान्यवरांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत माहिती देण्याकरीता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
कलारंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर याबाबत माहिती देताना म्हणाले की, या कार्यक्रमा प्रसंगी ज्येष्ठ कलावंत, साहित्यिक मधु जोशी, शास्त्रीय संगीत विशारद जयश्री लेले, ऑलिम्पिकवीर पैलवान मारुती आडकर, ज्येष्ठ पत्रकार माधवराव सहस्त्रबुद्धे, ज्येष्ठ क्रिकेटपटू मिलिद गुंजाळ, ज्येष्ठ लोककला कलावंत, प्रबोधनकार शारदा मुंडे, संगीत विशारद विद्याधर शिधये, प्रसिद्ध लोककलावंत संजीवनी मळे नगरकर, ज्येष्ठ नाट्य कलावंत जगलराव भोईर, ज्येष्ठ भरतनाट्यम विशारद (कत्थक) गीता शर्मा आणि चिंचवड देवस्थन ट्रस्टचे माजी मुख्य विश्वस्त विघ्नहरी देव महाराज या सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच त्यानंतर झी कॉमेडी अवार्ड विजेते ” यदा कदाचित रिटर्न ” या मराठी नाटकाचा प्रयोग सर्व रसिक प्रेक्षकांसाठी विनामुल्य सादर होणार आहे.















