न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० डिसेंबर २०१९) :- पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित आणि दिग्दर्शित जाणता राजा या महानाटयाचा प्रयोग बारा वर्षांनी पुण्यात सादर होणार आहे. पुण्यातील सिंहगड रोडवर असलेल्या शिंदे मैदानावर २५ ते २९ डिसेंबर रोजी सादरीकरण होणार आहे. अशी माहिती शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणाले की, “जाणता राजा महानाटय प्रयोगास १५ एप्रिल १९८४ साली पुण्यातून सुरुवात केली. आजवर देश विदेशात १५५० प्रयोग झाले असून प्रत्येक प्रयोगाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. महानाट्यामध्ये १५० हून अधिक कलाकार हत्ती, घोडे, उंट, बैलगाडी, नेत्रदीपक आतषबाजी आणि नवीन रंगमंचासहित शिवजन्म पूर्व काळ, शिवजन्म, शिवरायांचा न्याय निवाडा, रांझ्याच्या पाटलाला दिलेली शिक्षा, अफझलखान वध,सुरत छापा,शाहिस्तेखान छापा,आग्र्याहून सुटका आणि रोमहर्षक राज्यभिषेक सोहळा अशा अनेक प्रसंगांचे सादरीकरण केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांनादेखील या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले असून तिसर्या किंवा चौथ्या दिवशी येण्याची शक्यता असल्याचे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितले.












