थेरगावच्या त्या घटनेवरून राष्ट्रवादीच्या संदीप काटेंचा उद्विग्न सवाल …
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ डिसेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेतील भ्रष्ट कारभाराचा आणखी एक नुमुना नुकताच पहावयास मिळाला. थेरगाव परिसरातील पडवळनगरमध्ये डेंग्यूमुळे दोन सख्या भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मागे एकदा महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर चिकनगुनियाने आजारी पडले होते. शहराला स्मार्ट सिटीकडे नेणारी वाटचाल अशा स्वरुपाची असेल तर, शहरातील नागरिकांना नको अशी व्यवस्था. महापालिकेचा वैद्यकीय विभाग काय झोपा काढत होता? असा उद्विग्न सवाल शहर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संदीप काटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.
संदीप काटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून पालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी व ठेकेदारांनी शहरातील कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सर्वत्र कचर्याचे ढीग साचले असून गटार, नाले तुंबल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. याकडे पालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाचे पुर्णतः दुर्लक्ष झाल्याने शहरात साथीचे रोग फैलावत असल्याने पालिका प्रशासनाच्या विरोधात नागरिकांमध्ये संताप आहे. त्यातच डेंग्यूच्या वाढत्या प्रकोपाने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. उजेर हमीद मणियार (वय ४, रा. पडवळनगर, थेरगाव) या चिमुकल्याचा शुक्रवारी (दि १३) रोजी पहाटे ४ वाजता मृत्यू झाला तर, त्याचाच ९ महिन्याचा लहान भाऊ अदनान हमीद मणियार याचा १६ नोव्हेंबर १९ रोजी दुदैवी अंत झाला.
शहर स्मार्ट सिटीचे स्वप्न पाहत असतानाच नागरिकांच्या आरोग्याच्या समस्यांकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. महापालिका नागरिकांच्या आरोग्यासाठी वैद्यकीय सुविधांवर कोट्यावधी रुपये खर्च करते. मात्र, त्यातून केवळ नागरिकांच्या कररूपी पैशांचा चुरडा होताना दिसत आहे. सत्ताधाऱ्यांचा देखील महापालिका प्रशासनावर वचक दिसत नाही. केवळ टक्केवारीवर भर देणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी नागीरकांच्या आरोग्य सुविधांकडे कानाडोळा करून चालणार नाही. अन्यथा नागरिकांच्या प्रशोभाला सामोरे जावे लागेल. महापालिकेने संबधित बालकांच्या कुटुंबियांना मोठी आर्थिक मदत करावी, असे या पत्रकात काटे यांनी म्हटले आहे.












