न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ डिसेंबर २०१९) :- राज्यातील महामंडळे बरखास्त केल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्याने पिंपरी चिंचवड शहरात भाजपला जोरदार धक्का बसला आहे.
राज्यात या आधी असलेल्या भाजपा – शिवसेनेच्या सरकारमध्ये राज्य लेखा समितीच्या अध्यक्षपदी अॅड. सचिन पटवर्धन यांची, तर भाजपचे सदाशिव खाडे यांची पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. अमित गोरखे यांना अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी तर हेमंत तापकीर यांना खादी ग्रामोद्योगच्या उपाध्यक्षपदी संधी मिळाली होती.
महाविकास आघाडीच्या सरकारने महामंडळे बरखास्त केल्याने या चौघांची पदे गेली आहेत. या बरोबरच मागील सरकारच्या काळात वीज वितरण सनियंत्रण समिती, रेशनिंग, संजय गांधी स्वावलंबन समिती अशा समित्यांवर झालेल्या नियुक्त्या रद्द होणार आहेत. त्या जागी राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसच्या स्थानिक नेते – कार्यकत्यांची वर्णी लागणार आहे. त्यामुळे तीनही पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्या दृष्टीने या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठांची मनधरणी सुरू केली आहे.












