न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसेंबर २०१९) :- नाताळ आणि ३१ डिसेंबर या दोन दिवशी शहरातील हॉटेल आणि बिअर बार पहाटे पाचपर्यंत खुले राहणार आहेत. दुकानांमध्ये बनावट मद्यविक्री होऊ नये, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने पथके स्थापन केली आहेत. मद्यप्राशन करणाऱ्या व्यक्तींना मद्यपान परवाना घेणे आवश्यक आहे. परवाना नसलेल्या व्यक्ती निदर्शनास आल्यास संबंधितांसह हॉटेलचालका विरुद्धही कारवाई करण्यात येणार आहे.
नाताळ आणि इंग्रजी नववर्षांच्या स्वागतानिमित्त मद्यप्राशन करणाऱ्यांसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्य परवाने देण्यात येतात. एक दिवसाचा परवाना विभागाच्या कार्यालयात, तर वर्षभर किंवा आजीवन मद्यप्राशनाचा परवाना ऑनलाइन देण्यात येतो. त्यामुळे संबंधितांनी मद्यपान परवाना घेणे आवश्यक आहे, असे कळविण्यात आले आहे.
मद्यपान परवाना घेण्यासाठी देशी मद्यासाठी दोन रुपये, विदेशी मद्यासाठी पाच रुपये, वर्षभरासाठी १०० रुपये आणि आजीवन परवान्यासाठी एक हजार रुपये शुल्क असल्याचेही विभागाकडून सांगण्यात आले.















