न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ जानेवारी २०१९) :- नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करणाऱ्या मद्यपी वाहनचालकावर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २०२ खटले दाखल करण्यात आले. पिपरी – चिंचवड पोलिसांच्या वाहतूक विभागातर्फे ही कारवाई करण्यात आली.
वाहतूक पोलिसांनी मुख्य रस्ते, चौक अशा ठिकाणी वाहनचालकाची तपासणी केली. नागरिकांनी सरत्या वर्षाला निरोप देतानाच मद्यपान करून वाहन चालवून वाहतूक नियमाचे उल्लंघन करणे, कायदा व सुव्यवस्थेस बाधा निर्माण करणे, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी मुख्य रस्ते, चौक अशा ठिकाणी वाहनचालकांची तपासणी केली. ब्रिथ ऑनलायझरचा वापर करून मद्यपान केले आहे किंवा नाही. याची पडताळणी करण्यात आली. यात काही वाहनचालकानी मद्यपान केल्याचे आढळून आले. त्यांच्यावर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली.
पोलीस आयुक्तालयांतर्गत सांगवी, हिंजवडी, निगडी, पिंपरी, भोसरी, चिंचवड, चाकण, दिघी आळंदी, देहूरोड – तळेगाव अशी दहा वाहतूक विभाग आहेत. या विभागात मंगळवारी (दि. ३१) रोजी रात्री वाहनांची व चालकाची कसून तपासणी करण्यात आली. या वेळी भोसरी विभागात सर्वाधिक वाहनचालक मद्यपान करून वाहन चालवित असल्याचे दिसून आले. त्यानुसार त्याच्यावर कारवाई करून ३६ खटले दाखल करण्यात आले. तर चाकण विभागात सर्वात कमी केवळ सहा खटले दाखल झाले आहेत.















