न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ जानेवारी २०१९) :- भरदिवसा घरात चोरी करण्यासाठी आलेल्या चोरांचा प्रतिकार करणाऱ्या जेष्ठ महिलेला चोरांनी केलेल्या मारहाणीत जीव गमवावा लागला. अज्ञात चोरांच्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती लोणावळा शहर पोलिसांनी दिली आहे. अज्ञात चोरांनी कपाट उघडून त्यातील १ लाखापेक्षा जास्त रुपये घेऊन पळ काढला. रेश्मा पुरुषोत्तम बन्सल (वय-७०) असे चोरांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या जेष्ठ महिलेचे नाव आहे.
ही घटना आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उघड झाली असून लोणावळा शहरातील द्वारका माई सोसायटी येथे घडली आहे. मृत्यू झालेल्या रेश्मा यांची दोन्ही मुले पुणे शहरात असून ते सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाऊंटंट) आहेत. तर पाच मुलींचा विवाह झाला असून इतर शहरात राहतात.
रेश्मा यांच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा दिसत नाहीत. चोरी करण्यासाठी आलेल्या अज्ञात चोरांचा रेश्मा यांनी प्रतिकार केला असल्याने त्या झटापटीत पडून त्यांचा मृत्यू झाल्याच प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. नैसर्गिक मृत्यू नसल्याचे देखील पोलिसांनी स्पष्ट केले आहे. घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील हे करत आहेत












