न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०१९) :- नीरजकुमार हा थेरगाव येथील सिल्वर नाईन या हॉटेलच्या बाहेर असलेल्या पानाच्या टपरीवर काम करतो. शुक्रवारी रात्री आरोपी दोघेजण टपरीवर आले. त्यांनी नीराजकुमारकडे सिगारेट मागितली. दोघांनी सिगारेट संपवली. त्यानंतर सिगारेट मागितली. त्यावर नीरजकुमार याने सिगारेट संपली असल्याचे सांगितले. यावरून दोघांनी नीरजकुमार याच्यासोबत वाद घालून बघून घेण्याची धमकी दिली.
त्यानंतर, रात्री दहाच्या सुमारास सिगारेट घेतलेल्या दोघांनी त्यांच्या आणखी दोन साथीदारांना बोलावून आणले. ‘तुला फार माज आला आहे’ असे म्हणत आरोपींनी नीरजकुमार याला टपरीमधून बाहेर काढून हाताने मारहाण केली. एका आरोपीने कमरेला लावलेल्या स्टीलच्या चाकूने नीरजकुमारच्या पोटात आणि खांद्यावर, कोपरावर वार केले. यामध्ये नीरजकुमारला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर आरोपी तिथून पळून गेले. ही घटना शुक्रवारी (दि. १०) रात्री दहाच्या सुमारास थेरगाव येथे सिल्वर नाईन हॉटेल समोरील पानाच्या टपरीवर घडली.
नीरजकुमार रामअवध प्रजापती (वय २०, रा. थेरगाव, वाकड. मूळ रा. उत्तरप्रदेश) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चार अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.












