न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०१९) :- पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघात परिवर्तन झाले आहे. ‘आपला महासंघ पॅनल’चे प्रमुख अंबर चिंचवडे यांच्या नेतृत्वात परिवर्तन घडले आहे. चिंचवडे यांच्या आपला महासंघ पॅनलने चुरशीच्या लढतीत बाजी मारत महासंघावर कब्जा केला. बबन झिंजुर्डे यांच्या पॅनलचा धुव्वा उडाला असून त्यांना पराभव सहन करावा लागला आहे. दरम्यान, २००० साली महासंघाची स्थापना झाल्यानंतर यंदा पहिल्यांदाच निवडणूक झाली आहे. आजपर्यंत बिनविरोध निवडणूक झाल्या आहेत.
कर्मचारी महासंघ निवडणुकीसाठी स्व. शंकर अण्णा गावडे कर्मचारी महासंघ आणि आपला महासंघ या दोन पॅनेलमध्ये लढत होती. गावडे कर्मचारी महासंघाचे ‘बॅट’ तर आपला महासंघाचे ‘कपबशी’ निवडणूक चिन्ह होते. कार्यकारिणीच्या आठ जागांसाठी १६ जण तर १३ सदस्यपदांसाठी २६ जण असे मिळून ४२ जण निवडणुकीच्या रिंगणात होते. शनिवारी मतदान प्रक्रिया झाली होती. तब्बल ५७३३ जणांनी मतदान केले होते. ८२ टक्के मतदानाची नोंद झाली होती.
अंबर चिंचवडे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी महासंघात परिवर्तन घडवून आणले आहे. अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांच्या पॅनलचा पराभव झाल्याने झिंजुर्डे यांचे महासंघावरील गेल्या १५ वर्षातील वर्चस्व संपुष्टात आले आहे.
‘आपला महासंघ पॅनल’चे विजयी उमेदवार’
अध्यक्ष अंबर चिंचवडे, उपाध्यक्ष अभिमान भोसले, सरचिटणीस सुप्रिया सुरगुडे, चिटणीस योगेश रसाळ, सहसचिव बाळासाहेब कापसे, कोषापाल अविनाश ढमाले, संघटक धनाजी नखाते, प्रमुख संघटक गोरख भालेकर, कार्यकारिणी सभासद शुभांगी चव्हाण, विलास नखाते, अमित जाधव, सुरेश गारगोटे, बाळू साठे, अनिल राऊत, धनेश्वर थोरवे, अविनाश तिकोणे, रणजीत भोसले, सुभाष लांडे, मिलिंद काटे, नवनाथ शिंदे, योगेश वंजारे.












