न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे, जेजुरी :- भारिपचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी जेजुरी येथे आयोजित करण्यात आलेल्या दसऱ्या मेळाव्यामध्ये एकाच मंचावर उपस्थिती लावल्याने आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी राज्यात नवीन राजकीय समीकरणे पाहायला मिळणार काय? अशा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरु झाल्या आहेत.
याआधीच अॅड. प्रकाश आंबेडकरांनी २०१९ निवडणुकांसाठी एमआयएम सोबत बहुजन वंचित विकास आघाडी स्थापन करत राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवली होती. तर दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये महत्वाच्या शेतकरी नेत्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या खासदार राजू शेट्टी यांनी देखील मागच्या काही काळापासून भाजपाला अंतर देत काँग्रेसला जवळ केल्याचे चित्र आहे.
दसरा मेळाव्यात बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी कुपोषण, आदिवासी विकास, धनगर आरक्षण आणि बहुजन वंचित विकास आघाडीवर टीका करणाऱ्यांना आपल्या भाषणातून उत्तर दिले.
यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी, “धनगर समाजासह अनेक समाजांना न्याय मिळेल, असे २०१४ साली वाटत होते. जे संघर्ष करत होते, त्यांना न्याय मिळेल अशी आशा होती. हे वाटण्यामागे गोपीनाथ मुंडे यांचा आश्वासक चेहरा होता. सत्तांतर झाले, पण हे पाहण्यासाठी गोपीनाथ मुंडे या जगामध्ये राहिले नाहीत.” अशी खंत व्यक्त केली.










