न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जानेवारी २०१९) :- एका तरुणीशी असलेल्या प्रेम संबंधाच्या कारणावरून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना थेरगाव येथे शनिवारी (दि. २५) दुपारी घडली.
नीलेश राजेंद्र रणदिवे (वय २१, रा. नखातेनगर, थेरगाव) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. महेश डोंगरे आणि सनी ( पूर्ण नाव , पत्ता माहिती नाही ) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत जखमी निलेश याचे वडील राजेंद्र रणदिवे यांनी रविवारी (दि. २६) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास फिर्यादी यांचा मुलगा निलेश हा आपल्या मित्राशी घराजवळ गप्पा मारत उभा होता. त्यावेळी दुचाकीवरून आरोपी आले. तुला सांगितले होते ना त्या मुलीचा नाद सोडून दे, असे म्हणत दोघांनी शिवीगाळ करीत सुरवातीला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर निलेश याचे डोके डेनेजच्या झाकणावर आपटून त्यास जखमी केले. त्यानंतर त्यास फरपटत नेऊन डीपी जवळील खड्यात टाकून देत जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक एस. जी. रणवरे याबाबत अधिक तपास करीत आहेत.











